Weather Update : बदलापूर बनलं नवं थंड हवेचं ठिकाण, 11.2 अंश नीचांकी तापमानाची नोंद, पुढील 24 तास राज्यात थंडीची लाट
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा चांगलाच वाढला असून तापमानाचा पारा हा 12-13 अंशांच्या घरात होता. मात्र रविवारी बदलापूर शहरात 11.2 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.
Weather Update : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर हे नवं थंड हवेचं ठिकाण बनलं आहे. कारण यंदाच्या हिवाळ्यात पहिल्यांदाच 11.2 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद बदलापूर शहरात झाली आहे. याबरोबरच पुढील 24 तास राज्यात थंडीची लाट असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा चांगलाच वाढला असून तापमानाचा पारा हा 12-13 अंशांच्या घरात होता. मात्र रविवारी बदलापूर शहरात 11.2 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. बदलापूर शहरातील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली आहे. बदलापूर शहर हे समुद्रापासून दूर आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता हिवाळ्यात कमी होते. त्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचत असून ते इकडून मुंबईच्या दिशेने वाहत जातात. त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होते. त्यापुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जाते, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
अभिजीत मोडक यांनी बदलापूर शहरात त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर खासगी स्वयंचलित हवामान केंद्र बसवलं आहे. या माध्यमातून तापमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, पर्जन्यमान या सगळ्याची नोंद त्यांच्याकडे होत असते. सध्या मुंबई आणि उपनगरातील तापमान मोजण्यासाठी कुलाबा आणि सांताक्रुझ या भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळांची आकडेवारी ग्राह्य धरली जाते. मात्र या वेधशाळा त्या त्या भागातील तापमानाची नोंद घेत असून बदलापूर शहर हे मुंबईपासून 40 किलोमीटर दूर असल्यानं इथल्या तापमानाची नोंद मात्र अधिकृतरित्या होतच नाही. त्यामुळेच अभिजीत मोडक यांनी स्वयंचलित खासगी हवामान केंद्र बदलापुरात उभारलं असून त्याचा मोठा फायदा होताना दिसतोय.
पुढील 24 तास राज्यात थंडीची लाट ( Cold wave in Maharashtra for next 24 hours )
दरम्यान, पुढील 24 तास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहणार आहे. औरंगाबाद आणि जालन्यातही थंडीची लाट असणार आहे. किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.