Washim News : शिरपूरच्या जैन मंदिरातील वाद पुन्हा उफाळला; देवाच्या दारातच दोन पंथियांमध्ये तुंबळ हाणामारी
जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात पुन्हा एकदा मूर्ती पूजनावरून वाद झाल्याची घटना घडलीय. यात दोन पंथियांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय.
Shirpur Jain Mandir वाशिम : जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिम (Washim) जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात पुन्हा एकदा मूर्तीपूजनावरून वाद झाल्याची घटना घडलीय. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दिगंबर जैन आणि श्वेतांबरी जैन यांच्या भक्तांमध्ये आणि महाराजांमध्ये मूर्ती पूजनावरून काही वेळ शाब्दिक वाद निर्माण झाला आणि कालांतराने या शाब्दिक वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं.
मुख्य भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती पूजनची वेळ ठरवून दिली असतांना इतर वेळी मूर्तीपूजन करत असताना दिगंबरी जैन महतांना आणि भक्तांना विरोध केल्याने हा वाद झाल्याचं कळतंय. गेल्या एक तारखेला ही अशीच एक किरकोळ हाणामारी पर्यंतची घटना घडली होती. मात्र, त्यावेळी या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने पुढे कुठलीही कारवाई झाली नाही. मात्र, आज पुन्हा या नवीन वादाने डोकं वर काढल्याचे बघायला मिळाले आहे.
देवाच्या दारातच दोन पंथियांमध्ये तुंबळ हाणामारी
वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये कायम वाद होत असतात. आज मात्र या वादाचं पर्यवसन थेट हाणामारीत झालंय. त्यामुळे 42 वर्षानंतर या मंदिराचे दार उघडल्यानंतर वादाचं सत्र सुरूच असल्याचे चित्र आजही पाहायला मिळालंय. भाडोत्री गुंडाकडून श्वेतांबरी जैनांकडून ही मारहाण केल्याचा आरोप दिगंबर जैन यांच्या कडून केला जातोय. सध्या शिरपूरच्या जैन मंदिरात तणावपूर्ण शांतता आहे. तर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असून अद्याप या प्रकरणी कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार झालेले नाही. मात्र यात काही भाविक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच काही वेळामध्ये तक्रार दाखल होऊ शकते, असा अंदाजही पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केलाय.
जगात अनेक जातीधर्माचे आणि पंथाचे लोक आपापल्या दैवताला मानतात आणि त्यांनी दिलेला संदेश उराशी बाळगून त्याच्या शिकवणीचे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोरच त्यांचे अनुयायी एकमेकांना भिडत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नेमका वाद काय?
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती हक्का वरुन दोन पंथात हा वाद आहे. गेल्या दीडशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती श्वेतांबर जैन पंथीयांची की दिगंबर जैन पंथीयांची यावरून हा वाद सुरू होता. मात्र, गेल्या वर्षीच्या 22 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देत भक्तांसाठी हे मंदिर उघड करण्याचे आदेश दिले होते आणि दोन्ही पंथाना ठराविक वेळ ठरवून दिली होती. ठरवून देलेल्या वेळी मूर्ती पूजनाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी या मूर्तीची जी झीज झाली होती ती मूर्ती चांगल्या स्थितीत असावी, यासाठी मूर्तीला लेपणाचे कार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
मात्र, दरम्यानच्या काळात मूर्तीचे स्वरूप बदलून दिगंबरी मूर्ती ही श्वेतांबरी केल्या जात असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतरही अनेकवेळा या मंदिरावरुन दोन्ही पंथांमध्ये वाद निर्माण झाला होता आणि अखेर हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र अनेक दशकापासूनचा हा वाद आजही त्याच प्रमाणात सुरू आहे. त्याचाच परिणाम आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि दोन्ही पंथीयांकडून एकमेकाला हाणामारीचा प्रकार घडल्याचे आज पुन्हा बघायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या