(Source: Poll of Polls)
ST Bus Strike : आर्थिक न्याय्य मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांचा एल्गार; आषाढी एकादशी दिवशीच संपाचा इशारा
ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या बहुतांश संघटनांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे.
ST Bus Strike : मुंबई : आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) दिवशीच एसटी कामगारांनी (ST Employee) संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. आपल्या आर्थिक न्याय्य मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांनी एल्गार पुकारला आहे. पुढच्या महिन्यात 9 जुलै आणि 10 जुलै रोजी विधीमंडळाच्या अधिवेशनावर आझाड मैदान मुंबई येथे धरणं आंदोलनाचा इशारा एसटी कामगारांनी दिला आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट 2024 क्रांती दिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, 4 जुलै रोजी एसटी को. ऑप. बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधीकारी पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहितीही सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य या एसटी कामगारांच्या संघटनेनं दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या बहुतांश संघटनांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आजच राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आंदोलनाची नोटीस बजावणार आहे.
एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर लढा देण्याचा निर्णय झाला?
- राज्यसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायलाच पाहीजे
- प्रलंबीत महागाई भत्ता आणि फरक
- वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक
- वेतनवाढीच्या दराचा फरक
- 4849 रुपये कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप
- नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या 5 हजार, 4 हजार, 2500 रुपयांऐवजी सरसकट 5 हजार मिळावेत
- सर्व राप कर्मचाऱ्यांना इनडोअर आणि आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा
- खाजगीकरण बंद करा
- सुधारीत जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा
- जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा
- चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचाऱ्यांना अद्यावत आणि सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या
- वेळापत्रकातील त्रुटी दूर करा
- सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा. तसेच
- महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी.
- विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या
सर्व मागण्या विधानसभेची आचारसंहीता लागण्यापूर्वी मंजूर झाल्याच पाहीजेत, यासाठी एल्गार पुकारण्याचा ठरावही एसटी कामगारांच्या बैठकीत एकमतानं घेण्यात आला. तसेच, बैठकीत हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है…… हम सब एक है, असा नाराही एसटी कर्मचारी संघटनेनं दिला आहे.