पांडुरंगासह नाचणारी चक्री भजनाची 322 वर्षांची अनोखी परंपरा, काय आहे वैशिष्ट्य? जाणून घ्या सर्व माहिती
Chakri Bhajan : वारकरी संप्रदायाने भक्तीसंगीतातील अनेक रूपे मानवजातीला दिली आहेत. चक्री भजन हे वारकरी संप्रदायातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणून ओळखली जाते. ही परंपरा 332 वर्षांपासून सुरु आहे.
Chakri Bhajan पंढरपूर : महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक पुरातन परंपरा असून वारकरी संप्रदायाने तर भक्तीसंगीतातील अनेक रूपे मानवजातीला दिली आहेत. वारकरी संप्रदायातील अशा अनेक पुरातन परंपरेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाती ती चक्री भजनाची (Chakri Bhajan). गेली 332 वर्षे किंवा त्याही पूर्वीपासून चालत आलेल्या या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे ही परंपरा चालवणारे गुरुबाबाऔसेकर यांची चक्राकार नाचत अभंग गायनाची पद्धत होय. यालाच चक्री भजन असे नाव पडले.
हातात दिमडी आणि गुरु महाराज गुरुचा जयघोष करीत सुरु झालेले भजन रंगात येवू लागताच वेगवेगळ्या पद्धतीने नाचत गुरुबाबा मंत्रमुग्धपणे नाचू लागतात. या चक्री भजनाचे पारंपरिक 14 अभंग असून देगलूरकर घराण्याची ही परंपरा 332 वर्षांपासून सुरु आहे. देगलूरकर घराण्याचे गुंडा महाराज यांनी ही परंपरा रामपूरच्या जंगलातही 14 दिवस केवळ कडुलिंबाचा पाला खाऊन सुरु ठेवली होती.
अशी आहे परंपरा
या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात विठूरायाची आळवणी गुरु गुंडा महाराज करीत असत. नंतर त्यांनी ही वीणा औसेकरांच्या पूर्वजांना सुपूर्द केली आणि गेली 225 वर्षे औसेकर घराण्यात बारा महिने चक्री भजनाची परंपरा रोज सुरु असते.
देशभरात चालते दररोज चक्रीभजन
आज माघ शुद्ध त्रयोदशीला हे भजन विठ्ठल मंदिरात होत असते. ज्या ठिकाणी सर्व संतांची पावले लागली तेथे नाचताना लोळण घेतल्यावर मनातील सर्व आसक्ती आणि विकारातून मुक्ती होते असे या घराण्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. औसेकर यांच्या घरात एखाद्याचा मृत्यू झाला तरीही परंपरा खंड होत नाही. उलट आधी चक्रीभजन होते आणि मगच मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळेच आज कर्नाटक , आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा अशा अनेक भागात लाखो औसेकर घराण्याचे शिष्य रोज चक्रीभजन करीत असतात.
औसेकर घराण्याची परंपरा
माघ त्रयोदशीला हे चक्रीभजन विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात करण्याची औसेकर घराण्याची परंपरा आहे. विठ्ठल मंदिरातील या अनुपम सोहळ्यात खुद्द परमात्मा पांडुरंगही नाचतो, अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे. या परंपरेचे मानकरी असलेले औसा संस्थानाचे गुरुबाबा महाराज औसेकर यांना फुलांच्या विविध दागिन्यांनी सजविण्यात येते. पायात चाळ, गळ्यात वीणा, डोक्यावर फेटा अशा वेशातील गुरुबाबा, दिमडीच्या तालावर नाचू लागताच साक्षात पांडुरंग नाचतोय, असा भास भाविकांना होत असतो.
आज विठ्ठल मंदिरात माघ यात्रेची सांगता
चक्री भजनातील अत्युच क्षण असलेली गिरकी घेताच देहाच्या विदेही अवस्थेत तल्लीन झालेले गुरुबाबा यांना जागे करण्यासाठी भाविकांना विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करावा लागतो. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही चक्री भजनाची परंपरा आज माघ यात्रेच्या सांगता सोहळ्यात विठ्ठल मंदिरात झाली. यावेळी औसा संस्थानाचे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक संत हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी विठ्ठल मंदिरात उपस्थित होते.
आणखी वाचा