(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली, चोरटे फरार
सकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह दुपट्टाही हिसकवण्याची घटना वर्ध्यात घडली. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वर्धा: मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. विद्या अतुल वंजारी (39) असं या महिलेचं नाव आहे. येथील जुनी म्हाडा कॉलनी परिसरातील मारुती भाऊ समाधी जवळील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली असून त्यामुळे या परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
विद्या वंजारी आज पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. त्या मारूती भाऊ समाधीकडे जात असताना मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ पोहचल्या असता, एक अनोळखी इसम मोटारसायकलीवरुन आला आणि त्याने एका हाताने महिलेच्या गळ्यावर झपटा मारून तिच्या गळ्यातील सोन्याच्या गोफसह हिरव्या रंगाचा दुपट्टा हिसकावून पळ काढला. तो इसम वेगाने केशवसिटी रोडने पळून गेला. अशी तक्रार महिलेने रामनगर पोलिसांत दाखल केली आहे. ही घटना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
जांभळा जॅकेट आणि टोपी घालून आलेल्या इसमाने हिसकावली सोनसाखळी
या चोरट्याने अंगात जांभळ्या रंगाचा जॅकेट घातला होता आणि टोपी घातलेली होती अशीही माहिती महिलेने दिली आहे. महिलेची सोनसाखळी ही तब्बल 17 वर्ष पूर्वीची खरेदी केली असून वजन अंदाजे 10 ग्रॅम आणि किंमत अंदाजे 15,000 रुपये होती. ती सोनसाखळी मोटरसायकल घेऊन आलेल्या अनोळखी इसमाने जबरदस्तीने गळ्यातून झपटा मारून हिसकावून चोरून नेली आहे. या घटना घडल्यामुळे महिला घाबरली आणि थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून या चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये दहशतीचे वातावरण
जुने म्हाडा कॉलनी परिसरातील मारुती भाऊ समाधी परिसरातून आयटीआय टेकडीवर अनेक महिला पहाटे पहाटे मॉर्निंग वॉक साठी जातात. आज सकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची बातमी नागरिकांच्या कानावर पडताच परिसरातील महिलांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडून दिलासा द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वर्ध्यात चेन चोरटे पुन्हा सक्रिय?
मागच्या वर्षी देखील वर्धा शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी काही चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. आता पुन्हा हे चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. घडलेल्या घटनेमुळे मात्र परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.