Wardha : वाघाच्या हल्यात सासू ठार, सून गंभीर जखमी, कारंजा तालुक्यातील घटना
तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या सासू-सूनवेवर वाघाने हल्ला केला. त्यामध्ये सासूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वर्धा: जिल्ह्यातील कारंजा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या नागझरी कंपार्टमेंट या संरक्षित परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या सासू-सुनेवर वाघाने हल्ला केला. यात सासू जागीच ठार झाली असून सून गंभीर जखमी आहे. येननीदोडका गावातील सुशीला भाऊराव मंडारी (60) असे मृत सासूचे नाव असून अनिता मंडारी (30) असे गंभीर जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. तिच्यावर कारंजा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या महिला
ग्रामीण भागामध्ये आदिवासी समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे तेंदूपत्ता गोळा करणे हा आहे. या भागातील महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगलामध्ये जात असतात. आज मंगळवारी कारंजा तालुक्यातील येनीदोडका या गावातील लोक नेहमी प्रमाणे जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी जंगल परिसरात गेले असता वाघाने एकाच कुटुंबातील दोन महिलांवर हल्ला केला. अनिता मंडारी, वय 30 वर्ष, राहणार येनिदोडका ही महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली. सुशीला मंदारी, वय 60 वर्ष यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. काही अंतरावर तेंदूपत्ता गोळा करत असलेल्या युवकाला ही घटना समजताच त्याने गावातील नागरिक आणि वनविभागाला माहिती दिली.
परिसरात पसरले दहशतीचे वातावरण
या घटनेमुळे नित्याच्या कामावर जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून काम करावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मे पासून तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी सुरवात झाली होती आणि आज 24 तारखेला त्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे परिसरातील काही नागरिक हे काम लवकर सुरु करुन आणि लवकर काम संपविण्याचा प्रयत्नात होते आणि त्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीतच आहेत. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या मशागतीची कामे जोमात सुरू असताना वाघाची धास्ती मनात असल्याने शेतीची कामे करावी कशी या चिंतेत शेतकरी आहेत.