कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाधवान पितापुत्रांची जामीनासाठी हायकोर्टात याचिका
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्यात राकेश वाधवान आणि सारंग वाधवान पिता-पुत्र हे मुख्य सूत्रधार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आर्थर रोड कारागृहात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही.
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान या पिता-पुत्रांच्या तब्येतीची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच आर्थर रोड कारागृहातील कोणत्या कोठडीत म्हणजेच बॅरेकमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे त्याचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्यात राकेश वाधवान आणि सारंग वाधवान पिता-पुत्र हे मुख्य सूत्रधार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आर्थर रोड कारागृहात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. तसेच आम्हाला विविध आजारांनी ग्रासले असल्यामुळे आमच्या जीवाला येथं जास्त धोका आहे, असा दावा करत वाधवान पित्रा-पुत्रांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत कारागृहातील कैद्यांमध्ये कोविड -19 प्रसार रोखण्यासाठी कोणती पावले उचलली? असा सवाल उपस्थित करत वाधवान पिता-पुत्रांच्या वैद्यकीय स्थिती आणि बॅरेकचा तपशील सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देत सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब केली.
एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग वाधवान यांना पीएमसी बँकेच्या 4355 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयासह मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागही करत आहे. दिवाळखोरीत निघालेल्या एचडीआयएलला कोट्यवधी रुपयांचे कर्ज देऊन पीएमसी बँक डबघाईला आली असा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे.