(Source: Poll of Polls)
Virar COVID Hospital Fire : कोरोना काळात राज्यात रुग्णालयातील दुर्घटनांचं सत्र सुरुच; जबाबदार कोण?
Virar COVID Hospital Fire : नाशिकची घटना ताजी असतानाच विरारमधील रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, अशा घटना पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत, यापूर्वीही रुग्णालय व्यवस्थेच्या चुकीमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सर्व घटनामुळे रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र नाशिकच्या दुर्घटनेतून सावरत नाही तेवढ्यात आज विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास विरारमधील कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं असून रुग्णालयातील इतर रुग्णांना स्थलांतरीत केलं जात आहे. दरम्यान, नाशिक आणि विरार येथे घडलेल्या घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलेल्या नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून रुग्णालय व्यवस्थेच्या चुकीमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू, तर भांडुप मधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी नागपुरातील कोविड सेंटरलाही भीषण आग लागली होती.
या सर्व घटनांमुळे पुन्हा एकदा रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मन सुन्न करणारी भंडाऱ्यातील घटना घडल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटल ने फायर ऑडिट करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर मुंबईतील भांडुपमधील कोविड रुग्णालयातील आगीनंतरही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत, त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तत्काळ करण्याचे निर्देशही होते. परंतु, त्यानंतर यासंदर्भात कोणतीच खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व दुर्घटनांची जबाबदारी नक्की कोणाची हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला मध्यरात्री आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे.
नाशिक ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबईतील भांडूपमधील कोविड रुग्णालयात आग, आगीत 11 रुग्णांचा मृत्यू
26 मार्च रोजी घडलेल्या घटनेत भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये सनराईज हे कोविड रुग्णालय आहे. या आगीत कोविड रुग्णालयातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.
नागपुरात कोविड सेंटरला लागलेल्या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू
नागपूर 9 एप्रिल रोजी शहरातील वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र या आगीत 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.
मन सुन्न करणारी भंडाऱ्यातील घटना, अतिदक्षता विभागातील आगीमुळे 10 दुर्दैवी बालकांचा मृत्यू
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली होती. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली होती. या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून बालकांचा मृत्यू झाला होता. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :