CM Eknath Shinde : घटना अत्यंत दुर्दैवी, सखोल चौकशीचे आदेश, मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसला नाही. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली
CM Eknath Shinde : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसला नाही. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर आजचा दिवस खूप दु:खद आहे. राजकारणाची कधीच भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या घटनेच्या तपासासाठी रायगड पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. शासन विनायक मेटे यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते आज मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील बैठकीला येत असताना त्यांचे अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यांची मोठी धडपड, तळमळ होती. शासन नक्कीच त्यांच्या भावनेसोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अतिशय संघर्षातून घडलेलं नेतृत्व : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करतो, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला. तळागाळातील विषयांची माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपल्याचे फडणवीस म्हणाले. गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेल्याचे फडणवीस म्हणाले.