(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तीस वर्षांचा दोन गटातील संघर्ष अखेर संपुष्टात! बाबा-काका यांचे मनोमिलन
तीस वर्षांपासून सुरु असलेला दोन गटातील संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. विलासकाका पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे मनोमिलन झालं आहे.बाबा-काकाला एकत्र आणण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
कराड : काँग्रेस पक्षाच्या विचारांचे असूनही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट आणि माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे गट आता एकत्र आले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून या दोन्ही गटात विस्तवही जात नव्हता. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसची सातारा जिल्ह्यातील ताकद कमी होत गेली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही गटांना एकत्र आणले आहे.
विलासकाका पाटील हे काँग्रेसचे कराड दक्षिणमधून 35 वर्षे प्रतिनिधित्व करत होते. तर त्याच वेळी पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत होते. विलासकाका यांचे तळागाळापर्यंत कार्यकर्ते तयार झाले होते. त्यामुळे कराडमध्येच नाही तर सातारा जिल्ह्यात काकांचा दबदबा होता. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले असले तरी काका कधीही काँग्रेसपासून दूर गेले नाहीत. काँग्रेसच्या विचारांशी काका बांधले गेलेत. त्यामुळे कितीही पक्षांची विचारणा झाली तरी काकांनी कधीही काँग्रेसच्या विचारांशी तडजोड केली नाही. पण काँग्रेसमध्ये काका आणि बाबा यांच्यात वाद होता. हा वाद एक दोन नाही तर तीस वर्षांचा आहे. पण वैचारिक मतभेद विसरून हे दोन्ही गट एकत्र आले आहेत.
काका आणि बाबा यांच्यात काय वाद होता?
1991 साली पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात आले. तेव्हापासून या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत धुसफूस होती. निवडून आलेले पृथ्वीराज चव्हाण केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले. तर विलासकाकांनी राज्याच्या राजकारणात आपला जम बसवला. मात्र, दोन्ही गटातील कुरघोडीमुळे काँग्रेसचे नुकसान झालं. 2014 साली मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना विलासकाका 35 वर्षे नेतृत्व करत असलेल्या कराड दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यानंतर काका आणि बाबा यांच्यातील हा संघर्ष टोकाला पोहचला. विलासकाकांनी बंडखोरी करून पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक केली. त्यानंतर काँग्रेसमधील संघर्ष आणखीच वाढला.
भाजपला शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू वाटतो : बाळासाहेब थोरात
कोल्हापूर प्रमाणे आमचं बी ठरलंय : विलासकाका
काका आणि बाबा हे गट एकत्र येतील असे कुणाला वाटतं नव्हतं. प्रत्येकजण विचारत होते. काय ठरतंय का नाही? काय होतंय का नाही? मी फक्त सांगत होतो जरा धीर धरा कोल्हापूर प्रमाणे आमचं देखील ठरलं आहे. आणि आज तोच दिवस आहे. आता पुन्हा एकदा सातारा जिल्हा काँग्रेसमय करून दाखवू असं देखील काका म्हणाले.
आमच्यातील वादामुळे पक्षाचं नुकसान : पृथ्वीराज चव्हाण
एकमेकांमधील वादामुळे साताऱ्यात काँग्रेसचे नुकसान झालं आहे. नव्यानं पक्षाला बांधायचं असेल तर एकत्र येणे गरजेचं होतं. आता सातारा जिल्ह्यातील परिस्थिती बदलायला आम्ही तयार आहोत. आजच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही.
उदयसिंह पाटील तुम्हाला राज्यातली देखील जबाबदारी पार पडायची आहे : बाळासाहेब थोरात
आजच्या या कार्यक्रमामुळे पक्षाला मोठं बळ मिळेल. पृथ्वीराज चव्हाण यांची रामबाण उपाय करण्याची पद्धत आहे. परत कधीच आजार होत नाही. गेल्या पाच वर्षात अशी ही बनवाबनवी काम सुरू होते. विलासकाका यांची तडक फडक काम करण्याची पद्धत आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलं.
गेल्या तीस वर्षातील संघर्ष विसरून हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. मनोमिलन झाले असले तरी देखील तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना स्वीकारणं हे गरजेचे आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा आश्वासन आज पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.
कृषी कायद्याबद्दल जे पंजाब-राजस्थानने केलं ते महाराष्ट्राने केलं पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण