(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं कोल्हापूर-अमरावतीत ट्रॅक्टर आंदोलन तर राजू शेट्टी यांचा टोलनाक्यावर रास्तारोको
कृषी विधेयकाच्या विरोधात आज काँग्रेसकडून कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आलं.कोल्हापुरातील आदोलनात काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको.
कोल्हापूर/अमरावतीत : कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर, अमरावतीत ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आले. तर सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकरी विरोधी कृषी विधेयकांच्या विरोधात काही काळ रास्ता रोको केला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात देशभर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. अमरावती देखील काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, राज्यभर काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन
माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली-कोल्हापूर रोडवर अंकली टोलनाक्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे पायदळी तुडवतो हा संदेश या आंदोलनातून द्यायचा आहे. केंद्र सरकारने कृषी विषयक तीन विधेयक घाईगडबडीत मंजूर केली आहेत. त्यामुळे केंद्राच्या विश्वासाला तडा गेला असून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी विधेयके मंजूर केली गेलीत, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. केंद्र सरकारने अध्यादेश मंजूर केलेला आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून उद्योगपती धार्जिने कायदे असल्याचे आरोप करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एक रकमी एफआरपी आणि दोनशे रुपये अधिक दर मिळावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आलेली आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प होती.
अर्णब गोस्वामी वरुन राजू शेट्टी यांचा भाजपवर निशाणा
देशभरात अर्णब गोस्वामी समर्थनात भाजपकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरुनही राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाजपला वेळ नाही. मात्र, त्यांची तळी उचलून धरणाऱ्या संपादकाला वाचवण्यासाठी वेळ आहे, अशी टीका करत एका महिलेच्या पत्नी आणि सासूने आत्महत्या केली तिचे दुःख भाजपला दिसत नाही. मात्र, एका संपादकाचे दुःख या लोकांना दिसते, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
अमरावती काँग्रेसचं ट्रक्टर आंदोलन
अमरावती काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी विरोधी कृषी विधेयकांच्या विरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील नेहरू मैदानातून या ट्रॅक्टर रॅलीला पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या रॅलीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपले ट्रॅक्टर आणून या मोर्चात सहभाग घेतला. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत अशी आंदोलनं सुरूच राहील अशी प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. Raju Shetti | भाजपला त्यांची तळी उचलून धरणाऱ्या संपादकाला वाचवायचं आहे : राजू शेट्टी