Kolhapur Accident: कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
Kolhapur Accident: तावडे हॉटेल चौकात रस्त्याकडेला शेकोटी करून उभ्या असलेल्या तिघांवर अचानक काळाचा घाला आला. भरधाव इनोवा कारने नियंत्रण सुटल्याने थेट तिघांना चिरडले.

Kolhapur Accident: पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात आज (1 जानेवारी) नववर्षाच्या सुरुवातीलाच पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तिघांना जोरदार धडक दिल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तावडे हॉटेल चौकात रस्त्याकडेला शेकोटी करून उभ्या असलेल्या तिघांवर अचानक काळाचा घाला आला. भरधाव इनोवा कारने नियंत्रण सुटल्याने थेट तिघांना चिरडले. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात ठार झालेल्या तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
कसबा बावड्यातील एकाचा सांगलीत मृत्यू
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी सोलापूरजिल्ह्यात देवदर्शन करून गावाकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला गुहागर–विजापूर मार्गावर खानापूरजवळ भीषण अपघात झाला. दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी तामखडी परिसरात घडला. या अपघातात विश्वास शामराव चौगुले (वय 59, सध्या रा. कऱ्हाड, जि. सातारा; मूळ रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुरेखा चौगुले आणि दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. मूळचे कसबा बावडा येथील रहिवासी असलेले विश्वास चौगुले हे व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबासह सध्या कऱ्हाड येथे वास्तव्यास होते. ते पत्नी, दोन मुले तसेच मित्र तानाजी जाधव (रा. वाठर, ता. कऱ्हाड) आणि लता विष्णू कुंभार (रा. वाठार) यांच्यासोबत देवदर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यात गेले होते. परतीच्या प्रवासात तामखडी गावाजवळ त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारशी जोरदार धडक झाली.
इतर महत्वाच्या बातम्या






















