'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा' भाजपचे निष्ठावंत संतरंज्या उचलत असतानाच आता राष्ट्रवादीमधील खदखद समोर आली!
Ajit Pawar NCP: मिळालेल्या जागांचा सौदा करून पक्षाची इभ्रत पणाला लावली, राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर भाजपचे चेहरे निवडणूक लढत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Ajit Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या समजल्या जात असताना घराणेशाहीने केलेल्या कळसाने सर्वपक्षीय निष्ठवंतांना सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. भाजपने या सर्वांवर स्वकीयांना डावलून डझनाने आयारामांना पायघड्या घालून स्वागत चांदा ते बांदा उमेदवारी दिली आहे. आता अशीच स्थिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झाली आहे. जळगावमधील तिकिटवाटपावरून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा देताना काळीज पिळवटून टाकणारं पत्र अजित पवार यांना लिहिलं आहे. अभिषेक पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. देवकरांनी जागांचा सौदा केला आहे. पुत्र प्रेमासाठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा गंभीर आरोप या पत्रात केल आहे. अभिषेक पाटील यांनी आपल्या पत्रात 'आमच्या शेंबड्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना तुम्ही फक्त पाणी भरा' अशा शब्दात तोफ डागली आहे. ज्याला समाजकारणाची आणि राजकारणाची काळजी नाही, अशा नेत्याच्या मुलासाठी जागा राखून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या जागांचा सौदा केला
मिळालेल्या जागांचा सौदा करून पक्षाची इभ्रत पणाला लावली, राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर भाजपचे चेहरे निवडणूक लढत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महानगराध्यक्ष असूनही एबी फॉर्म वाटपाच्या अधिकारापासून वंचित ठेवत अपमान केल्याची भावना अभिषेक पाटील यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
काय म्हटलं आहे पत्रात?
जळगाव शहर व जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व आपण ज्यांच्याकडे सोपवले आहे, त्यांनी अलीकडील महापालिका निवडणुकीतील जागावाटपातून पुन्हा एकदा स्वतःचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. स्वार्थासाठी पक्षाची इभ्रत पणाला लावली आहे, मिळालेल्या जागांचा सौदा केला आणि त्यातून स्वतः मोकळे झाले.
आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा
या न्यायाने, माजी मंत्री व पक्षाच्या प्रमुख नेत्याने स्वतःच्या मुलासाठी एक जागा राखून ठेवली. ज्याला राजकारणात वा समाजकारणात काडीचीही रुची नाही. उरलेल्या जागांवर घड्याळाच्या चिन्हाखाली भाजपचे चेहरे निवडणूक लढवणार आहेत. ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. हे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट याचा निकाल आपणच द्यावा.
या साऱ्या प्रक्रियेत पक्षाला काय मिळाले? हा प्रश्न जितका साधा आहे तितकाच महत्वाचा आहे. आणि कार्यकर्त्यांना काय मिळेल, हे तर सांगायलाच नको. वर्षानुवर्षे झेंडे उचलणारे, वेळ-श्रम-पैसा खर्च करणारे, कायम घरच्यांची नाराजी सहन करून बोलणी खाणारे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्या वाट्याला सन्मानाऐवजी अपमान, आणि न्यायाऐवजी समजूतदारपणाच्या नावाखाली शांत बसण्याचा सल्ला मिळत आहे. या अश्या भंकस नेतृत्वाखाली जळगाव शहर व जिल्ह्यात पक्ष कसा सांभाळला जाईल आणि पुढे कसा नेला जाईल? या प्रश्नाचे उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे.
खर सांगायचं झाल तर आपण दिलेल्या जबदारीनुसार मी जळगाव शहराचा महानगराध्यक्ष आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म महानगराध्यक्ष या जबाबदारीने माझ्याकडे दिले पाहिजे होते व माझ्या सहीशिवाय ते ग्राह्य धरले जायला नको होते. हे पदाच्या अधिकाराचे उल्लंघन नाही का? आणि अपमान सुद्धा. पक्ष विचारांवर उभा असतो, कार्यकर्त्यांवर उभा असतो, डुप्लिकेट, स्वार्थी, लबाड लोकांवर नाही, सौद्यांवर नाही.
महोदय, माझा हा निर्णय रागातून नाही; तो वेदनेतून आहे. तुमच्या नेतृत्वावर प्रेम होते, आहे आणि राहील. पण अन्यायावर डोळे झाकून उभे राहणे मला जमणार नाही. म्हणूनच, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा, प्रेम करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा विरोधाचा नाही, तर आत्मसन्मानाचा आहे. कदाचित हा आवाज किरकोळ वाटेल; पण तो अनेक न बोललेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थतेचा प्रतिध्वनी आहे, एवढी नम्र नोंद घ्यावी.
इतर महत्वाच्या बातम्या




















