(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी नाराजीची चर्चा, आता सनसनाटी गौप्यस्फोट, छगन भुजबळांना भाजपसोबत जायचे नव्हते, पण.... वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ
छगन भुजबळ भाजपसोबत जाण्यास अजिबात इच्छुक नव्हते, हे त्यांनी मला खाजगीत सांगितलंय. मात्र त्यांच्या मागे तपास यंत्रणा असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Gadchiroli News : मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. तसेच छगन भुजबळ यांनी अनेकदा महायुतीला अडचण निर्माण होईल, असे वक्तव्यही केले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)हे राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा नव्हानं सुरु झाल्या आहेत. अशातच सध्याच्या राजकीय वर्तुळातून मंत्री छगन भुजबळांबाबत अनेक प्रतिक्रिया येत असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत मोठा दावा केला आहे.
छगन भुजबळांना भाजपसोबत जायचे नव्हते, पण....
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भाजपसोबत जाण्यास अजिबात इच्छुक नव्हते, हे त्यांनी मला खाजगीत सांगितलंय. मात्र त्यांच्या मागे तपास यंत्रणा आणि इतर दबाव असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. सोबतच अजित पवार, अशोक चव्हाण हे देखील स्वेच्छेने गेले नसणार, त्यांच्यावरही तपास यंत्रणेचा आणि अनेक चौकशीच्या प्रकरणातील दबाव असल्याने या दबावामुळे ते भाजपमध्ये गेले असणार, ज्यांच्यावर चौकश्या सुरू होत्या तेच भाजपसोबत गेले. भाजपने त्यातून ही फौज जमा केली असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
सरकार टेंडर आणि कमिशन खोरीत मग्न
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात चाललेला भोंगळ कारभार तसेच जनसामान्यांना उद्भवणार त्रास आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधेबाबत मिळालेल्या तक्रारी याची गंभीर दखल घेत आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळताच उपस्थित अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, यांची कानउघाडणी करून आरोग्य सेवेबाबत असंवेदनशील पणाचा कळस गाठणाऱ्या सरकारला चांगले धारेवर धरले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे, प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणे, रात्रपाळी वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिति, अशा समस्या असताना सरकार टेंडर काढणे आणि कमिशन खाण्यात मग्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
इतर महत्वाच्या बातम्या