(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Heavy Rain : पूर्व विदर्भात पावसाचा पुन्हा जोर वाढला! महाराष्ट्र - मध्यप्रदेशसह शेकडो गावांचा संपर्क तुटला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसापासून नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Vidarbha Rain Update : गेल्या दोन- तीन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदीनाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी
मध्यप्रदेशात होत असलेल्या पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीची धोक्याची पातडी 245.50 ही मध्यरात्री ओलांडली आहे. सध्या कराधा येथील पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे. प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
भंडाऱ्यात सकाळपासून पावसाची संततधार
भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. शेकडो नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं साहित्यांची नासाडी झाली आहे. तर, शेती पाण्याखाली आल्यानं पिकांचं नुकसान झालं आहे. या पूरपरिस्थिती भंडारा जिल्हाधिकारी आणि बचाव पथक नजर ठेवून आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत. सध्या गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटला असून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मदत दिली जात आहे. प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चंद्रपूरातील इरई धरणाची सर्व 7 दारे उघडली
अशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्याची देखील आहे. चंद्रपुरात आज पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू आहे. काल संध्याकाळ पासून सुरू असलेला पाऊस अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 58 टक्के पाऊस झालाय. तर गेले 5 दिवस जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसानीचे पंचनामे सुरू असतांनाच पावसाचे पुनरागमन झाल्याने सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इरई धरणाची सर्व 7 दारे 0.5 मीटर ने उघडली आहेत. तर इरई नदीत 237 क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग होतोय. परिणामी इरई नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आली आहे.
पुजारीटोला धरणाचे 13 तर सिरपूर धरणाचे 7 तर दरवाजे सुरु
गोंदिया जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवरी तालुक्यातील सिरपूर आणि सालेकसा तालुक्यांतील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पुजारीटोला धरणाचे सर्व 13 दरवाजे तर सिरपूर धरणाचे सर्व 7 दरवाजे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहेत. तर कालीसरार धरणाचे दरवाजेसुद्धा उघडण्याची शक्यता असून बाघ नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील 14 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
'या' गावांना दिला सतर्कतेचा इशारा
बाघ नदीच्या किनाऱ्यालगत केहरीटोला, तिरखेडी, भाडीपार, बोदलबोडी, नदीटोला, दरबडा, धानोली, म्हसीटोला, साखरीटोला, झालीया, गोंडीटोला ही गावे तर बाघ (बहेला नदीच्या) किनाऱ्यावरील गल्लाटोला, लोधीटोला, चिंगलुटोला, खेडेपार, गुलाबटोला, कुंभारटोला, पठाणटोला, नवेगाव, पोवारीटोला कुआढास नाल्याच्या किनाऱ्यालगत असलेले घोंसी, गरुटोला या गावांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावातील लोकांनी नदीकाठी जाऊ नये अशा सूचना महसूल विभागाने गावकऱ्यांना केल्या आहेत.
महाराष्ट्र - मध्यप्रदेशचा संपर्क तुटला
मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे. परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरून तीन फूट पाणी वाहत असल्यानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या: