Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
Mahayuti Government Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे नाराज होऊन शुक्रवार साताऱ्यातील आपल्या मूळगावी निघून गेले होते. मात्र, ते काल मुंबईत परतले होते.
मुंबई: राज्यातील विधानसभा महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतरही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच सरकार स्थापन होईल, असा कयास होता. मात्र, आता महायुती सरकारचा (Mahayuti Government) शपथविधी 5 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप भाजपने (BJP) विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली नाही. त्यामुळे भाजपच्या गोटातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप त्याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मोबदल्यात गृहमंत्रीपदाची मागणी लावून धरल्याने तिढा आणखी वाढला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाराज झाल्यामुळे दरे या मूळगावी निघून गेल्याची चर्चा होती. मात्र, रविवारी संध्याकाळी ते मुंबईत परतले असून आजपासून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा चर्चा सुरु होईल.
विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीच्या यशात आपलाही वाटात असल्याचे एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे. याच बळावर एकनाथ शिंदे यांनी गृह, महसूल आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गृह खाते कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाहीत. परंतु, एकनाथ शिंदे आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे मुंबईतील तिन्ही नेत्यांच्या आजच्या चर्चेत गृहमंत्रीपदाबाबत काही तोडगा निघणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आजच्या चर्चेत तिन्ही पक्षांना नेमकी किती मंत्रीपदं आणि खाती मिळावीत, याबाबतही चर्चा होईल. तसेच मंत्रिमंडळात नेमक्या कोणत्या नेत्यांना संधी मिळेल, याबाबतही चर्चा केली जाईल, अशी माहिती आहे. या बैठकीत गृहमंत्रीपद आणि इतर खात्यांवरुन कोणताही तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीत चर्चेची एक फेरी होऊ शकते. परंतु, एकनाथ शिंदे यांचा सध्याचा ठाम पवित्रा बघता ते गृहमंत्रीपदाच्या मागणीवरुन माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे संकेत मिळत आहेत.
एकनाथ शिंदेंचा सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव
महायुती सरकारमध्ये गृहमंत्रीपदाची मागणी मान्य होत नसेल तर आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही. एवढेच नव्हे तर शिंदे गट सरकारमध्ये सामील न होता बाहेरुन महायुतीला पाठिंबा देईल, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मांडला होता. मात्र, भाजप नेतृत्त्व एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये असलेच पाहिजेत, यासाठी आग्रही आहे. शिवसेनेचे आमदारही एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सामील व्हावे, या मताचे आहेत.
आणखी वाचा
तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा; एकनाथ शिंदे म्हणाले, सहाजिकच आहे कारण...