(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दीक्षीत यांचे निधन
जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे आज सायंकाळी एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. अनंत दीक्षित हे 'सकाळ'चे माजी समूह संपादक होते. अनंत दीक्षित हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवाशी होते .
मुंबई : जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे आज सायंकाळी एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. अनंत दीक्षित हे 'सकाळ'चे माजी समूह संपादक होते. अनंत दीक्षित हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवाशी होते . त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात कोल्हापूर सकाळपासून सुरू झाली होती. ते बरेच वर्षे कोल्हापूर सकाळचे संपादक होते. त्यानंतर ते पुण्यात सकाळ मध्ये रुजू झाले होते. सकाळचे ते काही वर्षे मुख्य संपादक होते. जवळपास 20 वर्षे सकाळ मध्ये काम केल्यानंतर ते पुणे लोकमतमध्ये गेले होते. एक अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.
महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, कोल्हापूरच्या विकासाला आपल्या लेखणी आणि वाणीने आकार देण्यात दीक्षित यांचा मोठा वाटा होता. साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान करवीरवासिय कायमच स्मरणात ठेवतील. राज्यातील अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. त्यांचे विवेचन वस्तुनिष्ठ आणि तर्कावर असायचे. प्रश्न धसास लागेपर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून प्रयत्न केले. नवे लेखक आणि कवी यांना सकाळच्या माध्यमातून त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक लेखक कवी घडले.
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दिक्षीत यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी अनंत दिक्षीत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अनंत दिक्षीत हे विचारांनी परखड व अनेक पत्रकारांचे आदर्श होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. कोल्हापूर आणि पुण्याशी त्याचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या संस्कारातून घडलेले पत्रकार यापुढच्या काळात त्यांचे विचार पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.