(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण परीक्षेआधी प्राधान्याने करावं, बोर्डसह शिक्षक आणि पालकांची मागणी
Corona Vaccination: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) येत्या तीन जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केलीय.
Corona Vaccination: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) येत्या तीन जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केलीय. याचपार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांचं (10th- 12th Students) परीक्षेआधी प्राधान्यानं लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी बोर्डासह शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रात 15 मार्चला इयत्ता दहावी आणि 4 मार्चला बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातून दहावी आणि बारावीचे 26 लाखांच्यावर विद्यार्थी बसणार आहेत.
राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामुळं इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचं प्राधान्यानं लसीकरण करावं, अशी मागणी बोर्डाकडून करण्यात आली. त्यानंतर शिक्षक आणि पालकांनी सुद्धा बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केलीय.
राज्यात बोर्ड परीक्षेच्या कामात सहभागी होणाऱ्या दोन ते अडीच लाख शिक्षकांना प्राधान्यानं बूस्टर डोस देण्यात द्यावा, जेणेकरून बोर्ड परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडतील असं शिक्षकांचं म्हणणे आहे. राज्यातील साधारणपणे 26 लाख विद्यार्थी हे दरवर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षा देतात. त्यामुळं परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे, असंही मत शिक्षकांनी मांडलंय. दरम्यान, मुंबई महापालिकेनं शाळांकडून 15 ते 18 वयातील विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. विद्यार्थीसुद्धा लस घेण्यासाठी तयार आहेत. तसेच लसीकरण सुरू केल्यास पालकांच्या संमतीनं प्रशासनाच्या सहकार्यानं शाळेत लस देण्यास सुद्धा शाळा तयार आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर कधी?
दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत. तसेच, बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंच होणार आहेत.
दहावी-बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार?
बारावीचा निकाल जून 2022च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै 2022च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- ओमायक्रॉनचं संकट तीनपटीनं वाढतंय, जुनी जम्बो कोव्हिड सेंटर कार्यरत करणार; महापौरांची माहिती
- महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत 150 टक्के अधिक सक्रीय रुग्ण आढळणार : केंद्र सरकार
- ओमायक्रॉनने चिंता वाढवली, मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ