ओमायक्रॉनचं संकट तीनपटीनं वाढतंय, जुनी जम्बो कोव्हिड सेंटर कार्यरत करणार; महापौरांची माहिती
Mumbai Mayor on Coronavirus : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.
Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. ओमायक्रॉनचे संकट तीनपटीने वाढ असून जुनी जम्बो कोव्हिड केंद्र कार्यरत करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. नागरिकांनी स्वत: वरच निर्बंध घालावे असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, लहान मुलं बाधित होत आहेत, काळजी घेण्याची गरज आहे. माणसांना वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि आमचा प्रयत्न आहे. कोव्हिड सेंटरच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून जुनी जम्बो कोव्हिड सेंटर कार्यरत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या रुग्णालयांऐवजी लहान रुग्णालयांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही लोकं बेशिस्तपणे वागत आहेत. लोकांनी मास्क घालावे असे आवाहनही महापौरांनी केले. ओमायक्रॉनचे संकट तीनपटीनं वाढत असून तिसरी लाट दोन लाटेपेक्षा भयानक असू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मास्क न वापरणे धोकादायक ठरू शकते असेही त्यांनी म्हटले. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून राज्यातही संचारबंदी सुरू झाली आहे. राज्याचेच मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान देखील बोलतायत नियम न पाळल्यास लाॅकडाऊन करावं लागेल असेही त्यांनी म्हटले. लोकांनी यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे असेही आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.
मुंबईबाहेरून आलेली लोकं शिस्त बिघडवत आहेत
मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत महापौरांनी म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे असेही त्यांनी म्हटले. सध्या क्लीन-अप मार्शल चांगले काम करत आहेत. लोकांनीदेखील आक्रमकतेपेक्षा संयम बाळगला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. क्लीन-अप मार्शलने कारवाई केलेले बरेचजण हे मुंबई पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर व इतर नियमांचे पालन केल्यास क्लीन-अप मार्शलला कारवाईची संधीच मिळणार नसल्याचेही महापौरांनी म्हटले.
दरम्यान, वांद्रे रिक्लेमेशन येथील वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दोन जानेवारीपर्यंत मुंबईकर या रोषणाईचा आनंद घेऊ शकत होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी ही रोषणाई बंद करण्यात आली आहे.