Coronavirus | अहमदनगरमधील जुलिया हॉस्पिटलचा उपचाराचा पॅटर्न चर्चेत; केंद्राच्या पथकाकडूनही कौतुक
एकीकडे राज्यात रेमडेसिवीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा तुटवडा देखील भासत आहे. मात्र जुलिया हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर औषध रुग्णांना दिले जात नाही.
अहमदनगर : राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात डॉ. रवी आरोळे यांच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर करण्यात येणारी अनोखी उपचार प्रणाली. काय आहे ही उपचार प्रणाली जाणून घेऊयात.
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील जुलिया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रवी आरोळे हे कोरोना रुग्णांवर उपचार करतात. विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 3700 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रूग्णांवर अनोखी उपचार प्रणालीचा उपयोग केला जातो. एकीकडे राज्यात रेमडेसिवीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा तुटवडा देखील भासत आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर औषध रुग्णांना दिले जात नाही. ICMR मान्यताप्राप्त औषध आणि ऑक्सिजन कोरोना बाधित रुग्णांना दिले जाते. त्यामुळे कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरे होतात.
विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये दिले जाणारे औषधे अत्यंत स्वस्त आहेत. त्यामुळे कोणतेही महागडे उपचार घेण्याची गरज रुग्णांना पडत नाही. तसेच कोरोनाचे रुग्ण तर बरे होतातच पण खर्च देखील कमी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशात रुग्णांना रेमडेसिवीर औषध दिल्याने रुग्ण बरे होतात. त्यामुळे या औषधांची मागणी देखील वाढत आहे. मात्र ICMR मान्यताप्राप्त औषध दिले तरी देखील रुग्ण बरे होतात, असा दावा डॉ. आरोळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर ही उपचार पद्धती राज्यात वापरली तर कमी खर्चात जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील, असं देखील त्यांनी सांगितले आहे.
डॉ. रवी आरोळे यांनी वापरलेल्या उपचार प्रणालीचे केंद्राच्या पथकाने देखील कौतुक केले आहे. तसेच अशी उपचार प्रणाली सर्वत्र वापरावी, असं पत्रही आरोळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. खऱ्या अर्थाने अत्यंत स्वस्त असलेली ही उपचार प्रणाली वापरली तर कोरोनवर निर्बंध घालण्यास मदत होईल.