(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी का दिली? आरोपी जयेश पुजारीचा धक्कादायक गौप्यस्फोट
Nitin Gadkari: बेळगावच्या तुरुंगातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच धमकी का दिली गेली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल होता. आरोपी जयेश उर्फ शाकीरच्या गेल्या दोन महिन्याच्या तपासातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये आरोपी जयेश पुजारी (Jayesh Pujari) उर्फ शाकीर याने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. जर, 'पीएफआय'वर (Ban On PFI) बंदी येऊ शकते, तर 'आरएसएस' वर बंदी का नको? (Ban On RSS) गडकरी हे संघाच्या फार जवळचे म्हणून त्यांना धमकी दिली असल्याचे पुजारी याने चौकशीत सांगितले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. बेळगावच्या तुरुंगातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच धमकी का दिली गेली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल होता. आरोपी जयेश उर्फ शाकीरच्या गेल्या दोन महिन्याच्या तपासातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्म परिवर्तन करणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर कुख्यात दहशतवाद्यांच्या हातचा बाहुला बनला होता. त्यांनीच 2014 पासून कर्नाटकातील विविध जेल मध्ये तुरुंगवासात असताना जयेश चे ब्रेन वाश केले होते. जयेशने बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग ही घेतली होती. एवढेच नाही तर बेळगावच्या तुरुंगात कैद असताना ही जयेशची अक्षरशः ऐश सुरू होती. त्याला जेलमध्ये असतानाही 24 तास मोबाईल फोन आणि इंटरनेटची सेवा उपलब्ध होती. जेलमध्ये असून ही त्याला झोपण्यासाठी बेड मिळत होते. आठवड्यातून दोन तीन वेळेला बीफची मेजवानी मिळायची. तुरुंगात जयेशच्या या ऐशोरामासाठी काही अदृश्य शक्तींनी एका वर्षात 18 लाख रुपये खर्च केल्याची कबुलीही ही जयेशने तपासात दिल्याची माहिती आहे.
जयेश गेले काही वर्ष तुरुंगात असून तुरुंगात असताना तो सातत्याने 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. याच लोकांनी जयेशच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे खास समर्थक म्हणून नितीन गडकरी यांच्या विरोधात प्रचंड विष पेरण्यात आले. जेव्हा एक कट्टरवादी आणि देश विघातक संघटना म्हणून पीएफआयवर बंदी लावली गेली आहे, तेव्हा आरएसएसवर बंदी का नको असा जयेश पुजारी उर्फ शाकीरचा समज असून नागपूर पोलिसांच्या तपासात त्याने गडकरी यांना धमकी देण्यामागे हेच कारण पुढे केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
2014 मध्ये बेंगलुरु तुरुंगात असताना जयेश पुजारी मोहम्मद अफसर पाशा या 'पीएफआय'च्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कौन्सिलच्या सचिवाच्या संपर्कात आला होता. त्यानेच जयेश उर्फ शाकीरला गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यास आणि खंडणी मागण्यास सांगितले होते. धक्कादायक बाब म्हणजे हाच मोहम्मद अफसर पाशा पीएफआयचा पदाधिकारी असताना 'एलटीटीई'च्या ही संपर्कात होता. वर्ष 2003 च्या बांगलादेशच्या ढाक्यामधील बॉम्ब ब्लास्ट मध्ये मोहम्मद अफसर पाशाचा सहभाग होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याशिवाय जयेश उर्फ शाकीर 2014 ते 2018 दरम्यान टी नसीर उर्फ कॅप्टन आणि फारूख नावाच्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. टी नसीर उर्फ कॅप्टनने जयेश उर्फ शाकीरला बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी जयेश उर्फ शाकीर हा धर्मासाठी कट्टरतावादी झाला असल्याचे मागील दोन महिन्याच्या तपासात समोर आले आहे. धार्मिक विचारांबाबत कट्टरतावादी भूमिका घेत असून धर्मासाठी जीव देऊ शकतो, अशी मानसिकता त्याची झाली असल्याचे समोर आले आहे. हे ही समोर आले आहे की धार्मिक विचाराबद्दल जयेश उर्फ शाकीर प्रचंड कट्टर असून धर्मासाठी जीव ही देऊ शकतो इतका कट्टरतावादी झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच स्वतःचा सर्वात मोठा शत्रू मानतो आणि त्याला हिजाब, ट्रिपल तलाक, एवढेच नाही तर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातल्या राजकीय वादा संदर्भातली सखोल माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.