युद्ध स्मारकासाठी शहीदांच्या जन्मभूमीची माती गोळा करण्यासाठी उमेश जाधव यांची मोहीम, 1.20 लाख किमी प्रवास करणार!
जम्मू काश्मीरमध्ये युद्ध स्मारकासाठी स्वयंस्फूर्तीने देशातील शहीद जवानांच्या जन्मभूमीची माती गोळा करण्यासाठी उमेश जाधव तब्बल एक लाख वीस हजार किमी प्रवास कारने करणार आहेत.विशेष म्हणजे या प्रवासाचा खर्च ते स्वतःच्या खिशातून करत असून कोणीही प्रायोजक नाही.
बेळगाव : जम्मू-काश्मीर इथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित युद्ध स्मारकासाठी स्वयंस्फूर्तीने देशातील शहीद जवानांच्या जन्मभूमीची माती गोळा करण्यासाठी उमेश जाधव तब्बल एक लाख वीस हजार किमी प्रवास कारने करणार आहेत. सध्या त्यांनी 67 हजार किलोमीटरचा प्रवास केला असून त्यांचे बेळगावमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. उमेश जाधव हे संगीत कलाकार आहेत.
युद्ध स्मारकासाठी उमेश जाधव एकूण एक लाख वीस हजार किलोमीटर ते प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे हा खर्च ते स्वतःच्या खिशातून करत असून कोणीही प्रायोजक नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करुन त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
उमेश जाधव हे मूळचे मूळचे औरंगाबादचे असून ते बंगलोर इथे लहानाचे मोठे झाले. नव्या बलशाली आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहणाऱ्या उमेश जाधव यांनी जम्मू काश्मीर येथील युद्ध स्मारकासाठी देशातील शहीद जवानांच्या जन्मभूमीतील पवित्र माती जमा करण्याच्या आपल्या मोहिमेला 9 एप्रिल 2019 रोजी प्रारंभ केला. बंगलोरच्या सीआरपीएफ सेंटर इथून या मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यानंतर उमेश जाधव यांनी आपल्या कारमधून सुमारे 67 हजार किमी अंतराचा प्रवास करुन विविध ठिकाणच्या शहीद जवानांच्या जन्म स्थानांची माती गोळा केली.
एप्रिल महिन्यापासून कोरोनामुळे जाधव यांच्या या मोहिमेमध्ये खंड पडला होता. पण जाधव यांनी 21 ऑक्टोबर 2020 पासून आपल्या या देशभक्तीपर मोहिमेला पुनश्च सुरुवात केली आहे. 21 ऑक्टोबर रोजी बंगलोर इथे अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्करराव यांनी ध्वज दाखवून उमेश जाधव यांच्या उपक्रमाला चालना दिली.
उमेश जाधव हे बेळगावहून पुढे संपूर्ण भारतभर असा एकूण 1.20 लाख किमी अंतराचा प्रवास करणार आहेत. या मोहिमेची सांगता पुढील वर्षी 9 एप्रिल 2021 रोजी कच्छच्या वाळवंटात होणार असल्याची माहिती उमेश जाधव यांनी दिली.