Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द; हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द, सूत्रांची माहिती
शिवनेरी दौऱ्यावर जाण्यासाठी हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नियोजित उद्याचा (21 जानेवारी) शिवनेरी (Shivneri) दौरा रद्द केला आहे. अयोध्येत (Ayodhya) सोमवारी 22 जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नाशिकमध्ये (Nashik) काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) पूजा करणार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी शिवनेरीवर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्याच्या शिवनेरी दौऱ्यावर जाण्यासाठी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे 22 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर
दुसरीकडे, नाशिक दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मातोश्रीहून रवाना होणार आहेत. त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. एक वाजता ते ओझरहून भगूरला जाणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन ते सावरकरांना अभिवादन करतील. दुपारी 2 वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू हॉटेलकडे उद्धव ठाकरे रवाना होतील.
काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजादेखील करणार
सायंकाळी 5.30 वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिराकडे निघणार आहेत. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते पूजादेखील करणार आहेत. तसेच 6.30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरतीदेखील उद्धव ठाकरे करणार आहेत. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन करून ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 10 ते 2 वाजेपर्यंत पक्षाचे प्रमुख वक्ते बोलणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल. सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे.
राम मंदिर सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. स्पीड पोस्टद्वारे हे निमंत्रण उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ठाकरेंना निमंत्रण मिळालं असलं तरी ते 22 जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. निमंत्रण मिळालं, तरी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील प्रमुख पक्षांच्या पक्षप्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यानुसार शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. तथापि, उद्धव ठाकरे यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच शरद पवारही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या