उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा धडाकेबाज टीझर जारी
Uddhav Thackeray Interview : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदाय संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा दुसरा धडाकेबाज टीझर जारी करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Interview : राज्यातील सत्तांतर नाट्य अद्याप संपण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेतून बंड करत काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं. तसेच, सर्व बंडखोर आमदरांकडून वारंवार शिंदे गट म्हणजेच, शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट असे दोन प्रवाह राज्याच्या राजकारणात दिसत आहेत. एवढंच नाहीतर आतातर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही दावा केला जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे सध्या चर्चा रंगली आहे ती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीची. याच खळबळजनक मुलाखतीचा दुसरा टीझर जारी करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदाय संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा दुसरा धडाकेबाज टीझर जारी करण्यात आला आहे. संजय राऊतांनी हा टीझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. दुसऱ्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे बंडखोरांवर घणाघाती टीका करताना दिसत आहेत. हम दो एक कमरे में बंद हो, असं सध्याचं सरकार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणत आहेत. याशिवाय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा होता का? आणि विश्वास दर्शक ठरावाला सामोरं गेले असते तर काय झालं असतं? यांसारख्या चर्चेत असणाऱ्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत थेट उत्तरं दिली आहे.
सामना दैनिकाकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. उद्या आणि परवा म्हणजेच, येत्या 26 आणि 27 जुलैला ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या पहिल्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळत आहेत. शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील उद्धव ठाकरेंची पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बहुप्रतिक्षित मुलाखतीमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड, मुख्यमंत्री पद, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा, बंडखोरांकडून सातत्यानं करण्यात येणारे आरोप-प्रत्यारोप यांसारख्या विषयांवर थेट प्रश्न विचारले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना खिंडार तर पडलंच, पण सोबतच मोठा राजकीय भूकंप झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यासर्व घडामोडींमध्ये बंड, सत्तांतर नाट्य, शिवसेनेतील अंतर्गत कलह यांबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विश्वासदर्शक ठराव, मुंबईचा घात? मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचे आक्षेप, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांच्या थेट प्रश्नांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात होत आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे मुलाखतीतून कोणते बाण सोडणार आणि काही गौप्यस्फोट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.