(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उदयनराजेंकडून शरद पवारांची भेट घेण्यामागचं मूळ कारण उघड
भाजपचे राज्यसभा खासदार असणारे उदयनराजे गुरुवारी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यांची ही भेट नेमकी का झाली याचे अनेक तर्क लावले जात असताना अखेर खुद्द उदयनराजे यांनी भेटीमागचं मूळ कारण स्पष्ट केलं.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीतून काढता पाय घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे जाणार असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची थेट दिल्लीत होणारी भेट अनेक चर्चांना वावही देऊन गेली. अखेर खुद्द उदयनराजे यांनीच भेटीनंतर त्यामागचं खरं कारण उघड केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं उदयनराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पवारांच्या दिल्लीती निवासस्थानी या भेटीदरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पवारांना भेटलात आता मोदींना भेटणार का, या प्रश्नावर हा विषय राजकारणाचा नाही असं म्हणत उदयनराजेंनी बगल देण्याचा प्रयत्न केला.
माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, 'इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघूनही यावेळी गायकवाड आयोग नेमण्यात आलं. त्यांनी अतिशय बारकाईनं माहिती संकलित केली, त्या धर्तीवर संपूर्ण मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत असा निर्णय त्यांनी दिला. त्याचसोबत दोन्ही सभागृहात तो मांडण्यात आला'.
वडीलकिच्या नात्यानं पवार साहेबांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष घालावं, अन्यथा एक मोठा उद्रेक होईल, असं उदयनराजे या भेटीमागचं कारण स्पष्ट करताना म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू नीट मांडण्यात आली नाही ही बाब अधोरेखित करत याच धर्तीवर आता शरद पवार यांनी मार्गदर्शनपर भूमिका घ्यावी. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता ही पवारांमुळंच आहे. त्यामुळं त्यांनीच आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालावं अशी आग्रही भूमिका उदयनराजेंनी घेतली.
नियम व अटी लागू! छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर निर्बंध
आरक्षण द्यायचं नसल्यास तसं स्पष्ट सांगून त्याबाबतची श्वेतपत्रिका काढा, असं म्हणत हे पाऊल न उचलल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल असंही ते म्हणाले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनानं शिवजयंती उत्सव साजरी करण्यावर काही निर्बंध घालण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवजयंती राज्याची अस्मिता असली तरीही या कोरोनाच्या काळात उत्सव साजरा करताना संसर्गाचा धोका संभवतो त्यामुळं उदयनराजेंनी शिवजयंती साठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे त्यांनी समर्थन केलं.