एक्स्प्लोर
माझ्या वयाचे असते, तर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंची सडकून टीका
उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील वाद थांबवण्यात शरद पवारांना यश आलेलं नाही. बैठक अर्धवट सोडून बाहेर आलेल्या उदयनराजेंनी 'रामराजे निंबाळकर माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती' अशा शब्दात टीका केली
मुंबई : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यातील अंतर्गत वाद सोडवण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अपयश आलेलं दिसत आहे. शरद पवारांसोबत सुरु असलेली बैठक अर्ध्यावर सोडून उदयनराजे बाहेर आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी अत्यंत खालच्या शब्दात रामराजेंवर निशाणा साधला.
'रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. कुणाचंही ऐकून घ्यायला मी लेचापेचा नाही' अशा शब्दात उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला. मी उदयनराजे आहे महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागतं, असंही ते पुढे म्हणाले.
रामराजेंनी चक्रम संबोधल्यामुळेही उदयनराजेंचा तीळपापड झाला. 'मी आहे चक्रम.... लोकांवर अन्याय झाला की मी होतो चक्रम. पिसाळलेल्या कुत्र्यासोबत राहिलं तर मला रेबीज होईल' अशा शब्दात उदयनराजेंनी चीड व्यक्त केली. शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत, पण मी सहन करणार नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
बैठकीनंतर बाहेर आलेल्या रामराजे निंबाळकरांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. 'नो कमेंट्स' असं म्हणत रामराजेंनी काढता पाय घेतला.
खासदार उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरता, रामराजे निंबाळकरांची टीका
काय आहे वाद?
नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वार्थासाठी त्यांनी 14 वर्ष बारामतीला पाणी पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केला होता.
छत्रपती असल्यासारखं वागा, सूर्याजी पिसाळासारखं वागू नका
उदयनराजेंवर 302 चे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी जरा छत्रपतींसारखं वागावं, असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी उदयनराजेंवर पलटवार केला होता. सगळी संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यावर कुणी छत्रपती लावतं का? आताचे छत्रपती हे स्वयंघोषित आहेत. लोक महाराज म्हणतात म्हणून आम्ही महाराज म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत हे मान्य आहे, मात्र छत्रपती असल्यासारखं वागा. कमीत कमी सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, एका बाजूला एक बोलायचं दुसऱ्या बाजूला एक बोलायचं, अशा शब्दात रामराजे निंबाळकरांनी उदयनराजेंवर टीका केली होती.
रणजितसिंह निंबाळकरांकडूनही टीकास्त्र
रामराजे निंबाळकर हे बारामतीकरांचा पट्टा गळ्यात बांधल्याप्रमाणे वागत आहेत. बारामतीने आपल्या जनतेचं नेलेलं पाणी कसं पुन्हा अडवता येईल याचा प्रयत्न करत आहेत. हे करताना ते छत्रपतींवरही टीका करत असून अशा माणसांना जोडे मारुन बाहेर हाकलून द्यावं लागेल, अशा शब्दात माढ्यातील भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
छत्रपतींच्या घराण्यावर केलेली टीका रामराजेंना शोभते का? लोकांवर टीका करताना पिसाळलेली कुत्री म्हणता, मग आपल्यावर टीका केल्यावर का चिडता, असा टोलाही रणजितसिंह निंबाळकर यांनी लगावला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement