(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू
सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकाला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात पोलीस नाईक सागर औंदुंबर चौबे यांचा जागीचं मृत्यू झाला आहे.
पंढरपूर : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसाने टेम्पो चालकाला गाडी थांबवण्यासाठी इशारा केल्याने चालकाने गाडीच अंगावर घातल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. यात पोलीस नाईक सागर चौबे या वाहतूक पोलिसाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी चालक नवनाथ शिवाजी गुट्टे हा औषधांचे साहित्य आयशर टेम्पोतून (क्र.MH.04. HD. 01 70) घेऊन हैदराबादहून मुंबईकडे जात होता. यावेळी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ पोलीस नाईक सागर चौबे यांनी टेम्पो चालकाला टेम्पो थांबवण्याचा इशारा केला. मात्र, टेम्पो चालकाने वाहन थेट चौबे याच्या अंगावर घातले. यात चौबे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान अपघात घडलेल्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या वैभव गायकवाड, स्वप्नील तळेकर, गणेश गायकवाड, उमेश भोसले आदी तरुणांनी चालकाला पकडण्यास पोलिसांची मदत केली. चालक नवनाथ शिवाजी गुट्टे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला इतर पोलिसांनी टेम्भुर्णी पोलीस स्टेशनला आणले आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Crime | सोलापूरमध्ये वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला ट्रक, वाहतूक पोलीस सागर चोबे यांचा जागीच मृत्यू