ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी कन्हैया केसरीचे मानकरी, पंजाबचा पैलवान चितपट
पंजाबचा पैलवान हिंद केसरी अजमेर सिंह याला पराभूत करुन विजय चौधरी कन्हैया केसरी ठरले आहेत. त्यांना कन्हैया केसरीची चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.
अहमदनगर : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पंजाबचा पैलवान हिंद केसरी अजमेर सिंह याला पराभूत करुन विजय चौधरी कन्हैया केसरी ठरले आहेत. त्यांना कन्हैया केसरीची चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. अहमदनगरच्या निघोजमध्ये कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.
कोरोनामुळे बंद झालेल्या कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरु कर व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीबद्दल आकर्षण निर्माण व्हावं यासाठी निघोज इथल्या युवा उद्योजकांनी एकत्र येत मच्छिंद्र लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत राज्यातील मल्लांसह पंजाबहून हिंद केसरी ठरलेले अजमेर सिंह यांनी सहभाग घेतला. कन्हैया केसरीसाठी विजय चौधरी आणि अजमेर सिंह यांच्यात निकाली कुस्ती झाली, ज्यात विजय चौधरी विजयी झाले. त्यांना कन्हैया केसरी बहुमान देत चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगावचे असलेले विजय चौधरी यांनी पुण्यातील कात्रज इथल्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलामध्ये 2008 पासून हिंद केसरी पैलवान रोहित पटेल आणि पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळण्यास सुरुवात केली.
विजय चौधरी यांनी 2014 ते 2016 या कालावधीत सलग तीन वर्ष मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. विजय चौधरी यांच्या कामगिरीवर खुश होऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्र पोलीस दलात विशेष नियुक्ती करण्याची घोषणा केली. त्यानुसार सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर विजय चौधरी यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. 2017 साली विजय महाराष्ट्र पोलिसांमध्ये रुजू झाले.