Nashik Police : नाशिकला मिळाले नवे अधिकारी, गृहविभागाकडून आदेश जारी, गुन्हेगारी रोखणार का?
Nashik Police : नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण पोलीस दलात महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
Nashik Police : राज्य सरकारच्या गृहविभागाने (Home Minister) राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून 143 वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्त तथा उपअधीक्षक पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण पोलीस दलात महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यात नाशिकच्या तेरा निरीक्षकांचा समावेश असून, त्यापैकी डॉ. सीताराम कोल्हे यांना नाशिक शहर आयुक्तालयातच बढती मिळाली आहे.
सरकारच्या गृह विभागाने पोलीस दलातील निःशस्त्र श्रेणीतील उपधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील पदावर पदोन्नतीने निवड सूची जाहीर केली आहे. त्यानुसार नाशिक शहर व ग्रामीण पोलीस (Nashik Gramin Police) दलातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक (Nashik) शहर व ग्रामीण पोलीस दलात अनेक नवीन अधिकारी दिसणार आहेत. नाशिक शहरातील सायबर पोलिस ठाण्याचे (Nashik Cyber Police) वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांची नाशिक शहर आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी पदस्थापना झाली आहे. तर, गुन्हे शाखा युनिट दोनचे आनंदा वाघ यांना श्रीरामपूर, भद्रकालीचे दत्ता पवार यांना शहादा, सरकारवाड्याचे साजन सोनवणे यांना अक्कलकुवा देण्यात आले आहे.
तसेच विशेष शाखेचे संजय बांबळे यांना धाराशिव, दहशतवादी विरोधी पथकाचे हेमंत सोमवंशी यांना गुन्हे अन्वेषण विभागात अपर पोलिस अधीक्षक, प्रभाकर घाडगे यांना ठाण्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत उपअधीक्षक पदावर बढती मिळाली आहे. नाशिक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे देवराम गवळी यांची मलकापूर उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बाबासाहेब ठोंबे यांची नाशिक गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. या पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना नियमाधीनतेचा आणि सेवाज्येष्ठतेचा हक्क नसेल, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
नाशिकमधून बदलीने पदस्थापना
नाशिक शहर आयुक्तालयातील दीपाली खन्ना-देशमुख यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार आणि सोहेल शेख यांची मनमाडमध्ये बदली करण्यात आली आहे. यासह अर्जुन भोसले नाशिक ग्रामीण यांची पंढरपूर, ज्ञानेश्वर जाधव मालेगाव छावणी यांची महाड, रायगड, जॉर्ज फर्नांडिस - गुप्तचर प्रशिक्षण संस्था, नाशिक यांची बृहन्मुंबई, संजय सावंत - महाराष्ट्र पोलिस अकादमी यांची मुख्यालय रायगड, नरसिंग यादव - महाराष्ट्र पोलिस अकादमी यांची बृहन्मुंबई, किशोर सावंत - नागरी हक्क संरक्षण नाशिक यांची आर्थिक गुन्हे, सिंधुदूर्ग तर, नितीनकुमार पोंदकुले - अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांची माणगाव, रायगडमध्ये बदली झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात नवे उपअधीक्षक
नाशिकमध्ये विक्रम कदम - पंढरपूर यांची कळवण, रणजीत पाटील - कराड उपविभाग यांची मालेगाव छावणी, निलेश पालवे - सहायक आयुक्त, नागपूर यांची निफाड, प्रदीप मैराळे - धुळे ग्रामीण यांची महामार्ग सुरक्षा पथक नाशिक, सुनिल भामरे - जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर यांची नाशिक ग्रामीणलआणि संजय सांगळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदूरबार यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत नियुक्ती झाली आहे.