Todays Headline 16th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline 16th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू
शरद पवार यांच्या हस्ते मल्टिस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे येणार आहेत. सकाळी 10.30 वाजता एका मल्टिस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन पवारांच्या उपस्थित होणार आहे. दुपारी 1 वाजता काष्टी येथील कोलाई देवी माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारत शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री, भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे उपस्थित रहाणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी सहा वाजता होईल.
‘जागतिक ओझोन दिना’निमित्त कार्यक्रम
‘जागतिक ओझोन दिना’निमित्त केंद्रीय आणि राज्याच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
संजय राऊतांच्या जामीनावर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी दिलेली मुदत संपणार
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या जामीनावर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे.
आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता रत्नागिरीत असणार आहेत.
शासन आपल्यादारी अभियान
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात शासन आपल्यादारी अभियान राबिवले जाणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बूथ आढावा बैठक होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज सर्वसाधारण सभा होणार आहे. हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे नेते या सभेला उपस्थित राहतील.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची पत्रकार परिषद
धडगाव तालुक्यातील दुर्देवी तरुणीच्या गावाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे भेट देऊन पत्रकार परिषद घेणार आहेत.
पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची पत्रकार परिषद
पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे, संध्याकाळी 6.30 वाजता.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पिक विम्याचे प्रलंबित प्रश्न आणि जिल्ह्यातील पीक नुकसानी मध्ये जिल्ह्याला डावलले गेलय असं म्हणत आज राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष एकत्रित येऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. यामध्ये धनंजय मुंडे आणि प्रकाश साळुंके सामील होणार आहेत, दुपारी 2 वाजता.
शिवसैनिकांचा मेळावा
बुलढाणा येथे आज निष्ठावांत शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे उपस्थित रहाणार आहेत, दुपारी 2 वाजता.
उसाच्या गळीत हंगामाबाबत बैठक
राज्यातील उसाचा गळीत हंगाम कधी सुरू करायचा याबाबत आज सह्याद्री अतिथीगृहावर, दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एका महत्त्वाच्या बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
पालघरमधील साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सुनावणी
पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2020 मध्ये झालेल्या या घटनेच्या तपासाला तत्कालीन महाराष्ट्र सरकारने सीबीआय तपासाला विरोध केला होता. पोलिसांनी तपासानंतर आरोपपत्र दाखल केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघायमध्ये एक बैठकीला उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी
युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. या प्रकरणावर उत्तर दाखल करताना केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देणे कायद्याने शक्य नसल्याचे म्हटले आहे. या लोकांसाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे की ते त्यांच्या युक्रेनमधील महाविद्यालयातून संमती देऊन दुसऱ्या देशात पदवी पूर्ण करू शकतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचे ऑक्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचे ऑक्शन होणार आहे. या संदर्भात सकाळी 9 वाजता मंत्री किशन रेड्डी पत्रकार परिषद घेणार आहेत.
योगगुरू बाबा रामदेव यांची पत्रकार
योगगुरू बाबा रामदेव आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते पतंजली समूहाच्या 5 कंपन्यांच्या आयपीओबाबत (IPO) तपशीलवार माहिती देतील. योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा आयपीओ लाँच करण्याची योजना आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.