Todays Headline 16th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
पंतप्रधान मोदी करणार बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
शिंदे सरकराची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक
शिंदे सरकराची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक आहे. या बैठकीत ठाकरे सरकराने घेतलेल्या नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला जाणार आहे.
अन्नधान्य, डाळींवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांचा बंद
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी उद्या देशव्यापी बंदची हाक दिलीय. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केलाय. त्यासाठी उद्या एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य
पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे.
मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी
देशात केरळात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केरळातील पाच जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. युएईतून आलेल्या एका 35 वर्षीय इसमाला संसर्ग झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.