(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Todays Headline 16 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
18 जिल्ह्यामध्ये 1165 ग्रामपंचायतीसाठी मतदान
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
अकोला - पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणूक
अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणुक होतेये. सातही पंचायत समित्यांवर वंचितचा वरचष्मा आहे. मात्र, वंचित पुर्ण बहूमत असलेल्या सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीत भाजपला लॉटरी लागती. कारण एसटी महिला राखीव उमेदवार त्यांच्याकडेच आहे. याशिवाय आज वेळेवर काही नवी समिकरणं उदयास येतात का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ठाण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य जाहीर सत्कार आज होणार आहे. अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे ठाण्याच्या हायलेंड मैदानात सत्काराचा कार्यक्रम होणार. यासाठी कॅबिनेट मिनिस्टर संजय राठोड यांच्या सह अनेक नेते उपस्थित असणार आहेत. दरम्यान, चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा रॅलीमधून मैदानात पोहोचणार आहेत. रॅलीमध्ये 300 रिक्षा, 200 बाईक चा समावेश असणार आहे
उदय लळीत सोलापूर दौऱ्यावर -
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातल्या हुतात्मा सभागृह येथे महाराष्ट्राने गोवा बार कौन्सिल यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार आहे. सरन्यायाधीश यांचा जन्मगाव सोलापूर असल्याने सोलापुरात त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांसह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश एम एस कर्णिक, न्यायाधीश एन जे जमादार, न्यायाधीश विनय जोशी, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील उज्वल निकम इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता या वकील परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ मधील विजयी करंडक घेऊन पथक प्रमुख व खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या स्वाधीन करणार आहेत. सांयकाळी ५ वाजता जुनी पुणे जिल्हा परिषद पुणे येथे कार्यक्रम होणार आहे.
शेफ विष्णू मनोहर नागपूरमध्ये दोन हजार किलोचा कुरकुरीत महाचिवडा तयार करणार -
जागतिक खाद्यान्नदिनी आज प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपूरमध्ये दोन हजार किलोचा कुरकुरीत महाचिवडा तयार करणार आहे... नंतर ते खयय्यांना मोफत वितरण केले जाणार आहे.. रामदासपेठ येथील विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी ९ ते ११ दरम्यान चिवडा तयार करण्यात येईल. नंतर कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते चिवड्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.. या चिवड्याचा उपक्रमाच्या माध्यमातून विष्णू मनोहर यांचा आजवरचा १४ वा विश्व विक्रम ठरणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे (डीबीयू ) लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. वर्ष 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग म्हणून, अर्थमंत्र्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. डिजीटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावेत आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात समाविष्ट होतील या उद्देशाने डीबीयूची स्थापना केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका, खाजगी क्षेत्रातील 12 बँका आणि एक लघु वित्त बँक यात सहभागी होत आहेत.
दिल्लीत पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन -
कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक खनिकर्म काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय समितीने 'भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेने शाश्वत खनिकर्म ” या संकल्पनेतून पहिल्या राष्ट्रीय कोळसा परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे 16 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी केले आहे. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या परिषदेला संबोधित करणार आहेत.
हिंदी भाषेतून वैदकीय शिक्षणाचा शुभारंभ -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वैदकीय शिक्षणाचा हिंदी भाषेतून शुभारंभ करणार आहे. भारतामध्ये मेडिकल शिक्षण पहिल्यांदाच हिंदीमधून होणार आहे. दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमातून याचा शुभारंभ होणार आहे. यावेळी अमित शाह उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या चार दिवसीय बैठकीला आज सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. आरएएस प्रमुख मोहन भागत या बैठकीला उपस्थित असणार आहेत.