राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल, वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी उमेदवारांची गर्दी
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ होती.
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) आज शेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती. परंतु, अनेक ठिकाणी वेळ संपल्यानंतर देखील अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केलीय.
9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. निवडणूक आयोगाकडून अर्ज दाखल करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर एवढा कालावधी देण्यात आला होता. तर 5 डिसेंबरपर्यंत अर्ज छाननी करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्याची सायंकाळी साडे पाच वाजण्याची वेळ संपल्यानंतर देखील अनेक ठिकाणी उमेदवारांची मोठी गर्दी होती. साडेपाच वाजण्याच्या आधी कार्यालयात आलेल्या सर्व उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत ही प्रक्रिया चालू राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. मात्र, ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने ऑफलाइन देखील अर्ज स्वीकारला सुरुवात झाली होती. मात्र मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. बीड आणि परभणीत अनेक ठिकाणी साडेपाच नंतर देखील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. परभणीतील कल्याण मंडपम या ठिकाणी भावी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली आहे. साडे पाच नंदर देखील ही गर्दी कायम आहे.
शाहुवाडी ग्रामपंचायतीचा निवडणुकीवर बहिष्कार
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडीच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातलाय. शाहुवाडीतील एकाही ग्रामस्थाने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला नाही. शाहूवाडी नगरपरिषद व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. परंतु, गावकऱ्यांची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे या गावाने निवडणुकीसाठी अर्जच दाखल केला नाही. महिनाभर आधीच गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा दिला होता.
रूग्णवाहिकेतून येऊन बाळंतिणीने सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला
बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका महिला उमेदवाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे चित्र दिसून आले. काही दिवसांपूर्वीच प्रसूती झालेल्या या महिला उमेदवाराने रूग्णवाहिकेतून येत सरपंचपदासाठी अर्ज भरला. परळतील वानटाकळी येथील सरपंच पदाच्या इच्छुक उमेदवार पल्लवी अरुण माने यांनी रूग्णवाहिकेतून येत अर्ज भरला. काही दिवसापूर्वीच पल्लवी यांची प्रसूती झालेली आहे. मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या स्वतः आपल्या परिवार आणि कार्यकर्त्यांसह रूग्णवाहिकेतून आल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांचे नवजात बाळही सोबत होते.
बीडमध्ये पोलिस बंदोबस्त
बीडमधील शासकीय आयटीआयमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली आहे. तर आष्टीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणाऱ्या ठिकाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी जरी मुभा दिली असली तरी देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंतच हे अर्ज भरावे लागणार होते. त्यामुळे आणखीन वेळ वाढवून देण्याची मागणी उमेदवार करत आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात
विधानपरिषदेतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिगणात उतरल्या आहेत. त्यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकर यांचे मूळ गाव असून गावातील बहुतांश नागरिकांनी गावच्या बैठकीत हिराबाई पडळकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्याचा चंग देखील बांधलाय. पडळकरवाडीमध्ये आतापर्यंत बिनविरोध निवडणुका होत आहेत. यावेळी देखील बिनविरोध निवडणूक करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आहे.
नंदुरबारमध्ये अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल
नंदुरबार जिल्ह्यात 123 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली आहे. गर्दीमुळे तहसील कार्यालयांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना होत असलेली गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयांमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची दमछाक होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कडाक्याच्या थंडीतही ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सर्व मोठ्या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने अनेकांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.