Amravati : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची आज 54 वी पुण्यतिथी, लाखो भाविक वाहणार मौन श्रद्धांजली
Tukdoji Maharaj : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज 54 वी पुण्यतिथी. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक महाराजांना मौन श्रद्धांजली वाहणार आहेत.
Tukdoji Maharaj Death Anniversary : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज 54 वी पुण्यतिथी. त्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले दोन लाखांपेक्षा अधिक गुरुदेवभक्त आणि परदेशातून आलेले गुरुदेव भक्त आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी दोन मिनिटं स्तब्ध होऊन तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर सर्वधर्माच्या प्रार्थनाही इथे होणार आहेत. एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वधर्माच्या प्रार्थना होणारं देशभरातलं एकमेव ठिकाण मोझरी आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तुकडोजी महाराजांचा समाधी स्थळी पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. दरम्यान पुण्यतिथी निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने नागपूर अमरावती महामार्गावरील वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळवली आहे.
1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना
4 एप्रिल 1935 ला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे आश्रमाची स्थापना केली. तुकडोजी महाराज यांचे साहित्य, तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा, त्यांचं वाङमय, त्यांचा आश्रम मोझरीत आहे. तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमामध्ये त्यांच्या महासमाधी सोबतच प्रार्थना मंदिर आहे. भव्य असं महाद्वार आहे. दास टेकडी आहेत. प्रार्थना मंदिरात सर्व साधू संतांचे प्रतिमा आहेत. अस्तिकुंड आहेत. जेव्हापासून तुकडोजी महाराज आले तेव्हा पासून मोझरीला महत्व आले.
तुकडोजी महाराज स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे ५० ग्रंथांची निर्मिती केली असून, त्यांचे अप्रकाशित वाङ्मयही बरेच आहे..
तुकडोजी महाराजांना लहानपणापासूनच भजनाची आवड
अमरावती जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी 30 एप्रिल 1909 रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी त्यांना 'तुकड्या' म्हणून हाक मारली. 'तुकड्या म्हणे', असे म्हणत जा, असे सांगितले. 'तुकड्या म्हणे' या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.