(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हाथरस येथील पिडीत तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा व्हावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे, असं कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान त्यासाठी सबंधित सरकारने न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन आरोपींना त्यांच्या पापाचं फळ लवकरात लवकर द्यावं. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत असतानाच स्त्रीशक्तीचा आदर करणाऱ्या सभ्य समाजनिर्मितीची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे असेही अजित पवार म्हणाले.
हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील, आपापली जबाबदारी पार पाडतील असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाथरस येथील पिडीत तरुणीला श्रद्धांजली वाहिली आहे.