एक्स्प्लोर
आमची मेगाभरती नाही लिमिटेड भरती : मुख्यमंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह अनेकांनी 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. आता 10 ऑगस्ट रोजी भाजपची दुसरी मेगाभरती होणार असल्याचं कळतं.
वर्धा : "आमची मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. परंतु जे भाजपच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील त्यांना नक्कीच पक्षात घेऊ," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची राज्यभरात महाजनादेश यात्रा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती, ईव्हीएम, युतीच्या जागावाटपासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
मेगाभरती नाही, लिमिटेड भरती
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह अनेकांनी 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. आता 10 ऑगस्ट रोजी भाजपची दुसरी मेगाभरती होणार असल्याचं कळतं. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "ही मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. आम्ही भरती बंद केलेली नाही. पण विदर्भातील काही लोक येण्यास तयार असतील आणि जे पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील तर त्यांना नक्की पक्षात घेऊ. आमच्याकडे लिमिटेड जागा आहे, त्यामुळे येण्यास इच्छुक खूप आहे, पण आम्ही सगळ्यांना घेऊ शकत नाही. काहींना घेतलं, काही येऊ शकतात पण फार नाही."
शपथेवरुन राष्ट्रवादीला टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर काल राष्ट्रवादीने शपथेचा कार्यक्रम घेतला. यावरुन राष्ट्रवादीचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. "आज काही पक्षांची अशी अवस्था झालीय, की कोणी त्या पक्षामध्ये राहायलाच तयार नाही. पक्षातच राहू म्हणून शपथ देण्याचा कार्यक्रम काहींना करावा लागतोय. ज्यांनी शपथ घेतली ते तरी पक्षात राहतात का हे मला माहित नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले.
आमचा हाऊसफुलचा बोर्ड लागलाय
"आमच्या पक्षात सक्षम कार्यकर्त्यांची कमतरता आहे. आजही काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे यायला तयार आहेत. पण आम्ही त्यापैकी काहींनाच घेणार आहे. ज्यांची लोकप्रियता आहे, जनाधार आणि ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या काहींनाच घेणार आहे. सगळ्यांसाठी आमच्याकडे जागा नाही. आमचा हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे," असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
जागावाटपाबाबत राज्यातील नेत्यांना अधिकार
"पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाच्या वाटाघाटीचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिले आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपावरुन अडचणी येतील. कारण काही ठिकाणी, शहरांमध्ये सगळ्या जागा आमच्याकडे आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्या जागा जास्त आहेत. युतीत लढणार आहोत, तर काही गोष्टी मिळतील, काही मिळणार नाही. त्यामुळे आम्ही चिंता करत नाही," असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच युतीला ज्याप्रकारे समर्थन मिळतंय, ते पाहता आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करावं
ईव्हीएमविरोधात राज्यभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. आज या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाआघाडीतील नेते एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केलं तर ते उत्तम होईल. सत्य स्वीकारण्याऐवजी आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि असत्याची कास धरतात. ईव्हीएम आता आलेलं नाही. या ईव्हीएमच्या कालावधीत दहा वर्षात त्यांनी केंद्रपासून राज्यात सगळीकडे राज्य केलंय. ईव्हीएमवर आंदोलन करण्याऐवजी जनतेत गेले आणि आम्ही हे केलं नाही, भविष्यात करु असं सांगितलं तरी जनता काही ना काही समर्थन देईल."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement