Nawab Malik: वानखेडेंच्या दाव्यात तथ्य नाही, नवाब मलिकांचं हायकोर्टात स्पष्टीकरण
Nawab Malik: ज्ञानदेव वानखेडे यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याला मलिकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जोरदार विरोध केला आहे.
Nawab Malik: ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध बॉम्बे हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याला मलिकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जोरदार विरोध केला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कारवाया उघडकीस येऊ नयेत म्हणूनच आपल्या विरोधात हा सव्वा कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेदेव वानखेडे यांच्याकडील पुराव्यात काहीच तथ्य नसल्यानं तो फेटाळण्यात यावा अशी मागणी नवाब मलिक यांनी या प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टाकडे केली आहे.
नवाब मलिक हे दररोज पत्रकार परिषदेत खोटेनाटे आरोप करत असल्यानं आपल्या कुटुंबाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप करत ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सव्वा कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समोर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवाब मलिक यांच्यावतीनं मंगळवारी हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. आर्यनच्या माध्यमातून शाहरूख खानकडनं खंडणी उकळण्यासाठीच हा क्रुझ ड्रग्ज पार्टीचा बनाव रचल्याचं आपण उघडकीस आणलं. त्यानंतर लगेच या बाबतचा तपास एनसीबीनं वानखेडे यांच्या कडून काढून घेत दिल्लीच्या एसआयटीकडे वर्ग केला. तसेच वानखेडे यांचं जन्म प्रमाणपत्रही खरं असल्याचे पुरावे त्यांना सादर करता आलेले नाहीत. हे प्रमाणपत्र बनावट असेल तर समीर वानखेडे यांनी सुधारित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करायला हवा. वानखेडे खोटे बोलत असून आपल्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने आदेश द्यावा यासाठी ते इथं प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर समीर वानखेडे प्रौढ असतानाही त्यांच्यावतीनं त्यांच्या वडिलांनी दिलासा मिळण्यासाठी खटला दाखल केला आहे. मात्र यासाठी कायद्याच्या तरतुदींनुसार न्यायालयाची रितसर पूर्वपरवानगी घेणं आवश्यक होतं. पण ही परवानगी घेण्यात आलेली नाही, असे मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं आहे. समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त त्यांची अभिनेत्री पत्नी क्रांती रेडकर, समीर यांची बहीण यास्मिन यांची जर आपल्याकडून बदनामी झाली असेल तर त्यांनी स्वतंत्र याचिका दाखल करायला हवी, असंही मलिक यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. या प्रकरणावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समोर सुनावणी होणार आहे.
सध्या आपल्याला सोशल मीडियातून वानखेडे धमक्या मिळत आहेत. तसेच अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत, याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात दाखल अर्जात म्हटलेलं आहे. त्यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुट्टीकालीन कोर्टात न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. मलिक हे दररोज सकाळी समीर नावखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांबाबत सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोमवारी सकाळीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल कथित ट्विट केले असून हे सर्व आरोप निराधार असून मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंसह त्यांच्या कुटुंबियांबाबत सुरू असलेली बदनामी थांबविण्यात यावी, अशी मागणी ज्ञानदेव वावखेडे यांनी हायकोर्टाकडे केली गेली आहे.
हे देखील वाचा-