(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine : कोरोना लाट ओसरली लसीकरण मोहीम जिरली, राज्यात लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प
कोरोनाचा (CoronaVirus) संसर्ग सुरु झाल्यानंतर वर्षभराने त्यावर परिणामकारक अशी लस आली. सर्वत्र लसीकरण (Corona Vaccination) सुरु झाले सुरुवातीला रुग्णसंख्या वाढती असताना नागरिकांनी ही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिला. मात्र सध्या नागरिकांनी या लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
परभणी : कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ही अतिशय वेगात पसरली आणि रुग्णसंख्या असो की मृत्युसंख्या यांचा आकडा तिप्पटीने वाढला त्यातच कोरोनावर लसीकरणाचा एकमेव पर्याय असल्याने लाट असताना नागरिकांची लसीकरणासाठी (Corona Vaccination) मोठी गर्दी केली. मात्र जशी जशी लाट ओसरली तशी लसीकरण मोहीम ही जिरली आहे. नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने राज्यात 11 लाख लसींचे डोस शिल्लक आहेत.ज्या लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या तेच लसीकरण केंद्रे आज ओस पडली आहेत.
कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर वर्षभराने त्यावर परिणामकारक अशी लस आली. सर्वत्र लसीकरण सुरु झाले सुरुवातीला रुग्णसंख्या वाढती असताना नागरिकांनी ही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिला. मात्र सध्या नागरिकांनी या लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 2 कोटी 65 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ज्यात पहिला डोस हा 2 कोटी 12 लाख लोकांना तर दुसरा डोस हा 52 लाख 81 हजार एवढ्या लोकांना देण्यात आलाय. राज्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 21.01 % एवढीच टक्केवारी या लसीकरणाची होते. त्यातच वयाची मर्यादा आणि पसरत असलेल्या विविध अफवा हे ही लसीकरण कमी होण्याची कारण आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. मागील काही दिवसापर्यंत केंद्रांसमोर रांगा लागत होत्या. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लोक लसीकरणाकडे पाठ फिरवू लागले आहेत. उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील वडगांव ( काटी ) ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोनाचे लसीकरण ठेवण्यात आले होते. सुमारे 150 डोस उपलब्ध होते. परंतु केवळ 50 जणांनीच लस टोचून घेतली. त्यामुळे उर्वरित डोस परत नेण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. इकडे परभणी शहारातील ज्या लसीकरण केंद्रावर रोज 200 लस दिल्या जायच्या मात्र अल्प प्रतिसादामुळे तिथे आज 80 लस दिल्या जात आहेत त्यातही आज केवळ 25 जणांनीच लस घेतलीय. परभणी जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात केवळ 3 लाख 3 हजार 718 नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. जिथे महिन्याआधी लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या त्याच मनपाची केंद्रे ओस पडली आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात नागरिकांचा लसीकरणला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय .परिणामी सरकारी तसेच खाजगी अनेक लसीकरण केंद्र ओसाड पडलीय अनेक केंद्रावर तूरळक गर्दी पाहायला मिळतेय. सोमवारी कोविशील्ड लसीचे 4500 तर कोवॅक्सीनचे 2 हजार डोस उपलब्ध झालेत. महिनाभरापूर्वी 300 ते 400 जणांचे लसीकरण एका केंद्रावर होत होते. तिथे आता 40 ते 45 लोकांचे लसीकरण होऊ लागलय.
लसीकरण कमी होण्यामागची कारणे?
- कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली
- लसीचे डोस मुबलक प्रमाणात न मिळणे
- 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद
- सध्या केवळ 45 वर्षाच्यावरती असलेल्या नागरिकांचे दुसरे डोस सुरु
- अजुनही लसीकरणाबाबत मनातील न निघालेली भीती
- लस घेतल्यानंतर अंगाला भांडे चिकटणे आदी पसरलेल्या अफवा
- शासकीय स्तरावर कमी होत असलेली जनजागृती
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टन्सिंग या बरोबरच अत्यतं महत्वाचे आहेत. ते लसीकरण कारण लसीकरणाने शरीरातील अँटीबॉडीस वाढतात. ज्या कोरोनाचा संसर्ग शरीरात वाढू देत नाहीत त्यामुळे सर्वानी लसीकरण करणे गरजेचे आहेच. शिवाय शासकीय स्तरावरूनही सर्वांसाठी लसीकरण खुले करण्याबरोबर जनजागृती होणे आवश्यक आहे.