हजारो महिलांच्या यशस्वी प्रस्तुती करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या ज्योती गवळी यांचा स्वतःच्याच प्रस्तुती दरम्यान दुःखद मृत्यू झाला आहे.
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या ज्योती गवळी यांचा स्वतःच्याच प्रस्तुती दरम्यान दुःखद मृत्यू झाला आहे. परिचारिका पदावर कार्यरत असलेल्या ज्योती गवळी या गेल्या पाच वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथे आरोग्य सेवा देत आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी पाच हजारहून अधिक महिलांच्या प्रसूती केली आहे. मात्र या परिचारिकेचा आज स्वत:च्याच प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे.
ज्योती गवळी यांनी गेल्या पाच वर्षात अनेक महिलांच्या गुंतागुंतीच्या प्रसूती सुद्धा यशस्वीरित्या केल्या आहेत. त्याचबरोबर सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यानदेखील त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ज्योती गवळींना प्रसुती कळा सुरू झाल्याने नातेवाईकांनी त्यांना हिंगोली येथील जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. दरम्यान त्यांची सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने गवळी यांना उपचारासाठी पुढे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
नांदेड येथे पोहोचल्यानंतर गवळी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण नांदेडमध्ये डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. गवळी यांची प्रकृती अधिकच खालावत होती. त्यांची खालावणारी तब्येत ही गवळींच्या नातेवाईकांच्या चिंतेचं कारण ठरलं. नातेवाईकांनी ज्योती गवळी यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी न्यायचे ठरवले. परंतु त्यांचा श्वसनाचा त्रास वाढल्याने त्यांनी नजीकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आणि त्या ठिकाणी 14 नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. ही घटना जिल्ह्यात कळताच जिल्ह्याभरात दुःख व्यक्त केले जाऊ लागले आहे.
गवळी यांना झालेल्या बाळाची प्रकृती आता ठणठणीत आहे. उपचारादरम्यान मृत पावलेल्या आईची या बाळाला मात्र आता सावली सुद्धा पाहायला मिळणार नाही. आईची उब काय असते हे बाळाला आयुष्यभर अनुभवायला मिळणार नाही.
संबंधित बातम्या
हिंगोलीत लिगो संशोधन केंद्रासाठी जमीन हस्तांतरित
गृहकर्जाच्या नावाखाली शिक्षकाला 25 लाख 76 रुपयांचा गंडा, हिंगोली येथील घटना
निम्न पैनगंगा धरणातील अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा मोठा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha