Prashant Bamb : पटसंख्येच्या तुलनेत राज्यात शिक्षकांची संख्या अधिक, सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही? प्रशांत बंब यांचा सवाल
राज्यात शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर शिक्षकांची संख्या जास्त निघेल असे वक्तव्य भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केलं.

Prashant Bamb : राज्यात शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर शिक्षकांची संख्या जास्त निघेल असे वक्तव्य भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केलं. शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करुन सरकारनं व्यवस्था निर्माण केली आहे. पण शिक्षकांमुळं आणि शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या लोकांमुळं राज्य दिवसेंदिवस डबघाईला जात असल्याचे बंब म्हणाले. सरकारी सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही? असा सवाल यावेळी बंब यांनी उपस्थित केला.
70 टक्के शिक्षक हे सरकारी योजनांचा गैरफायदा घेतात
अनेक शिक्षकांनी मुख्यालयी राहत असल्याचे सांगितले आहे. मात्र, ते खोटे असल्याचे बंब म्हणाले. शिक्षकांची मुलं जर त्यांच्याच शाळेत शिकली तर शिक्षमाचा दर्जा अधिक उंचावेल असे बंब म्हणाले. 70 टक्के शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यांचे स्वत:चे फ्लॅट आहेत. पती पत्नी एकाच ठिकाणी राहून डबल डबल भाडं उचलत असल्याचेही बंब यावेळी म्हणाले. 70 टक्के शिक्षक हे सरकारी योजनांचा गैरफायदा घेत असल्याचे बंब यांनी सांगितले. अनेक शिक्षक सांगतात की गावात सुख सुविधा नाहीत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की सुख सुविधेसाठी ती नोकरी नाही. मुलांच्या पिढ्या घडवण्याचे काम त्यांच्यावर असल्याचे बंब यावेळी म्हणाले.
पाच सप्टेंबरला गावात राहणाऱ्या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करणार
येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. त्या दिवशी सुट्टी असते. त्या दिवशी प्रत्येक गावात राहणाऱ्या शिक्षकांच्या घरी जाऊन सरपंच, पालक,शिक्षण समिती सदस्य, गावकऱ्यांनी त्यांचे पूजन करावे असे बंब यावेळी म्हणाले. जे शिक्षक गावात राहतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करुयात असेही बंब यावेळी म्हणाले. त्यांना घरी जाऊन सांगितले पाहिजे की, तुम्ही आमच्या गावात राहता ही चांगली बाब आहे. त्या दिवशी कृतज्ञता दिवस म्हणून शिक्षकांचा सन्मान करुयात असेही ते म्हणाले. मी देखील पाच सप्टेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून जितकी गावं शक्यत होतील तितक्या गावात जाऊन शिक्षकांचा सन्मान करणार असल्याचं बंब यांनी सांगितलं.
शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे शिक्षकांच्या चुकांना पाठिशी घालतायेत
दरम्यान, राज्यात उगीच संभ्रम होता कामा नये. म्हणून दूध का दूध आमि पाणी का पाणी होणं गरजेचं असल्याचे बंब यावेळी म्हणाले. मी ही बाब शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचे बंब यांनी सांगितले. सगळ्या समस्या मांडण्यासाठी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार निर्माण करण्यात आले होते. या शिक्षक आमदारांची आता गरज उरलेली नाही. त्यांच्या जागी कोरडवाहू शेतकऱ्यांचे आमदार देऊयात असेही बंब म्हणाले. बहुतांश शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे शिक्षकांच्या चुकांना पाठिशी घालत असल्याचे प्रशांत बंब म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
