चिमुकल्या बहीण-भावांच्या प्रसंगावधानतेनं दोघांचा जीव वाचला; झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुदैवाने बचावला
हवामान खात्याने 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान पर्जन्यवृष्टीच्या इशारा दिला होता. त्यानुसार पालघर (Palghar) परिसरात काल रविवार 25 ऑगष्ट रोजी दुपारच्यावेळी मुसळधार (Rain) पावसाला सुरूवात झाली.
पालघर : सध्या पावसाळा सुरू असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊसाचे अनेक ठिकाणी आगमन झाल्याचं पाहायला मिळते. त्यातून, अनेकदा पडझडीच्या घटनाही घडतात. तर, वीज वितरण कंपन्यांवरही कामाचा प्रचंड लोड असल्याचं दिसून येतं. काहीवेळा वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीजपुरवठा खंडीत केला जातो. तर, काही ठिकाणी वीजेच्या तारा तुटून विद्युत प्रवाह वाहिला जातो, त्यातून अपघाताच्या घटनाही घडतात. दोन महिन्यांपूर्वीच वीजांच्या तारांमधून विद्युत प्रवाह आल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, दोन चिमुकल्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे 2 जणांचा जीव वाचला आहे. पालघरमधील लोकमान्य शहरात ही घटना घडली असून झोमॅटो बॉय डिलिव्हरी देण्यासाठी आला होता, त्याच्यासाठी हे बहीण-भाऊच देवदूत ठरले आहेत.
हवामान खात्याने 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान पर्जन्यवृष्टीच्या इशारा दिला होता. त्यानुसार पालघर (Palghar) परिसरात काल रविवार 25 ऑगष्ट रोजी दुपारच्यावेळी मुसळधार (Rain) पावसाला सुरूवात झाली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास पालघरच्या लोकमान्य नगरमधील वसंतविहार बिल्डिंगच्या समोरील वीजेच्या खांबावरच्या पाच विद्युत तारांपैकी वरुन दुसऱ्या क्रमांकाची तार तुटून बिल्डिंगच्या गेटवर पडली. तुटलेल्या तारेत विद्युत प्रवाह सुरू होता. विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठ्ठा आवाज झाल्याचे ऐकून शेजारीत राहणाऱ्या ऋषभ अपार्टमेंटमधील व आनंद आश्रम शाळेत इ्यत्ता 7 वीमध्ये शिकणाऱ्या स्मीम भंडारे (वय 12 वर्ष ) आणि इयत्ता 3 रीत शिकणारी त्याची लहान बहीण कु.संस्कृती भंडारे (वय ८ वर्ष ) हे दोघेही बाल्कनीत धावत आले. आपल्या घरासमोरील वीजेची तार तुटल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवले. कारण, विजेची तार तुटल्यानंतर काही वेळातच, मोहमदरझा (वय 10 वर्षे ) हा लहान मुलगा वसंत विहार बिल्डिंगमधील त्याच्या आत्याकडे जात होता. मात्र, त्याला पाहून या दोघा बहीण-भावाने तार तुटल्याचे ओरडून सांगितले. त्यामुळे तो परत आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर, लगेचच त्यांनी तार तुटल्याची माहिती आपल्या वडिलांना सांगितली.
मुलांनी सांगितलेल्या घटनेनंतर वडिलांनी तार तुटल्याचे पाहून सदर माहिती फोनवरून विद्युत अभियंता प्रदिप अर्जुने यांना दिली. दरम्यान, याचवेळी रसम हाँटेलचा झोमॅटो फुड डिलिव्हरी बॉय किशनकुमार साठी हा जेवणाचे पार्सल देण्यासाठी वसंत विहार बिल्डिंगमध्ये जात होता. मात्र, स्मित व संस्कृती या दोघांनी "काका , तार तुटून गेटवर पडली आहे, पुढे जाऊ नका." असे ओरडून सांगत त्याला सावधान केले. त्यामुळे तो पुढे जायचा थांबला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. थोड्यावेळाने विद्युत मंडळाचे कर्मचारी येऊन तार जोडून गेले, त्यामुळे वीज पुरवठा देखील सुरळीत चालू झाला. दरम्यान, या दोघांनी अशा प्रकारे स्मित व संस्कृती या दोघांना चिमुकल्या बहीण-भावाने समयसूचकता व प्रसंगावधान राखून दोघांचे प्राण वाचविले.