School Reopen : राज्यात 17 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर
ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं मत टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातील तज्ञांनी व्यक्त केलं.

मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. मात्र हा निर्णय आता तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली.
ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं तज्ञांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतोय.
इतर राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांचे लसीकरण अथवा औषधेही उपलब्ध नसल्याने लगेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये असं टास्क फोर्सच्या तज्ञांनी सूचित केलं.
शाळा सुरु करण्याबाबत अतिंम निर्णय मुख्यमंत्री घेणार
शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय अंतिमतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची बैठक पार पडेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. पंजाबमधील एका गावात शाळा सुरु केल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली त्यामुळे आम्ही विचारपूर्वक पाऊले टाकत आहोत असं राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.
सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत.
आज होणारी स्कॉलरशिप परीक्षा फक्त मुंबईतच रद्द
मुंबई वगळता राज्यभरात आज पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होतेय. कोल्हापूर जिल्ह्यातील 238 केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा होत आहे. जिल्ह्यात पाचवीसाठी 20 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर आठवीसाठी सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. कोरोना काळातील ही पहिलीच मोठी परीक्षा असल्याने या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळाली. सकाळी नऊ वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर हजर झाले होते. परीक्षा केंद्रांवर ही सोशल डिस्टन्स थर्मल चेकिंग, सॅनिटायझर अशा कोरोना नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. शाळा सुरु नसल्यामुळे ऑनलाईन अभ्यास करून हे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असल्याने त्यांच्यामध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. तर प्रत्यक्ष परीक्षा होत असल्याने पालकांनीदेखील समाधान व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Majha Maharashtra Majha Vision : राज्यातल्या समान विकासासाठी 'नदी जोडो' प्रकल्पावर भर देणार: नाना पटोले
- Majha Maharashtra Majha Vision : आजवर महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का झाला नाही? नितीन गडकरी म्हणाले...
- कोल्हापूरचं नाव 'कलापूर' असं करावं, सचिन पिळगावकरांची मागणी
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या






















