शितल म्हात्रेंच्या ओरिजिनल व्हिडीओचा शोध घ्या; ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी
Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज दहिसर पोलिसांची भेट घेतली.
Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने दहिसर पोलिसांची भेट घेतली. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि विनोद घोसाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते. या भेटीनंतर विनोद घोसाळकर यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी व्हिडीओ आपल्या फेसबुकवरून लाईव्ह केला होता. मग हा व्हिडीओ त्याने डिलीट का केला? असा प्रश्न विनोद घोसाळकर यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधी ओरिजिनल व्हिडीओचा शोध घ्या अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
"या कार्यक्रमाशी आमचा काही संबंध नाही. त्यांचं अश्लील वर्तन लोकांनी कॅच केलं आहे. व्हिडीओ फक्त महाराष्ट्रच नाही तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आहे. आमचा कार्यकर्ता साईनाथ दुर्गे दोन दिवस बंगळुरूला होता. तो मुंबईत आल्यानंतर त्याला विमानतळावरून ताब्यात घेतलं. लोकप्रतिनिधींनी कसं वागावं? सामान्य नागरिक हातात हात घालून चालले तरी त्यांच्यावर 354 लागू पडतो, असा आरोप विनोद घोसाळकर यांनी केलाय.
'पोलिसांना दोन व्हिडीओ दिले'
दरम्यान, विनोद घोसाळकर यांनी शितल म्हात्रे यांचे दोन व्हिडीओ पोलिसांना दिल्याची माहिती दिली आहे. "मी पोलिसांना या आधीचे दोन व्हिडिओ दिले आहेत. शितल म्हात्रे यांच्यावर एमएसबी पोलिस ठाण्यात किडनॅपिंगचा गुन्हा दाखल आहे. माझ्यावर देखील त्यांनी गुन्हा दाखल केला होता. पण न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून मला क्लीन चीट दिली, " असे घोसाळकर यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी देखील ओरिजिनल व्हिडीओ शोधण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे तर ओरिजिनल व्हिडीओ शोधा असं ते म्हणाले. लाखो लोकांनी व्हिडीओ शेअर केलाय आणि पाहिलाय. कोणाकोणाला अटक करणार? फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुमच्या निशाणावर आहेत का? सामान्य महिलांना वेगळा न्याय आणि शीतल म्हात्रेंसाठी वेगळा न्याय का? 354 गुन्हे दाखल करणारी ही सराईत महिला आहे. आम्हीसुद्धा शितल म्हात्रेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आम्ही 24 तास वाट पाहू नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा संजना घाडी यांनी दिला आहे.
व्हिडीओ पाहा
महत्वाच्या बातम्या