(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनसाठी ठाकरे सरकारचं “वेट ॲन्ड वॉच”
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
मुंबई : दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रोज 5 हजारांच्या सुमारास कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहे. रोजच्या आकडेवाडीवर सरकारची नजर आहे. पुढचे 15 दिवस कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढल्यास म्हणजे दररोज 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले तर सरकार गंभीर विचार करणार आहे. त्याप्रकारचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाणदिन, दत्त जयंती आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकं आणखी घराबाहेर पडणार आहेत. महापरिनिर्वाणदिनी लोकांनी घरातून अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दत्तजयंती, नाताळ आणि नवीन वर्षासाठी खास नियमावली बनवणार आहे. दिवाळीत बाहेरगावी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्षाच्या अखेरीस सेलिब्रेशनसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यावर वेळीच निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि विमान सेवा काही कालावधीसाठी बंद करण्याचा विचार सुरु आहे. ज्या ज्या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय त्या त्या भागात चेस द व्हायरस ही संकल्पना पुन्हा राबवली जाणार आहे.
येत्या 8 ते 10 दिवसांत निर्णय घेणार : अजित पवार
बर्याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
अजित पवार म्हणाले, की “दिवाळीच्या वेळी बरीच गर्दी होती. गणेश चतुर्थी दरम्यानही अशीच परिस्थिती होती. आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. आम्ही पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. ” उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे."