Mumbai: जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर; डॉ. तात्याराव लहानेंसह सर्व अध्यापकांचे राजीनामे
JJ Hospital: निवासी डॉक्टरांच्या दबावामुळे जेजे रुग्णालयाच्या नेत्र शल्यचिकित्सा विभागाच्या सर्व अध्यापकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नेत्ररोग विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
Mumbai News: जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा (Ophthalmology) विभागातील सर्वच म्हणजे नऊ अध्यापकांचे राजीनामे (Doctors Resign) दिले आहेत. सहा महिने आधी आलेल्या निवासी डॉक्टरांच्या (Mard Doctors) हट्टापायी डॉक्टरांनी हे पाऊल उचललं आहे, त्यामुळे जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक विभाग (Ophthalmology Department) बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. गोरगरिबांसाठी मदत करणाऱ्या आणि मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांनी देखील राजीनामा दिला आहे, त्यामुळे जेजे रुग्णालयात (JJ Hospital) एकच खळबळ उडाली आहे.
निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) कडून डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) आणि डॉ. पारेख यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. राजीनाम्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टर संघटनेने (Mard Doctors) बुधवारपासून (31 मे) अनिश्चित काळासाठी संप पुकारला होता. एनएमसीच्या नियमांचे पालन होत नसल्याचा मार्डच्या डॉक्टरांचा आरोप होता. मात्र, याप्रकरणी जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील डॉक्टरांकडून याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या समितीसमोर स्पष्टीकरण दिलं होतं.
डीएमईआरचे निवृत्त संचालक आणि माजी अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) हे नेत्रशल्यचिकित्सक विभागात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करत असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने शैक्षणिक अभ्यासक्रमावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. नेत्रशल्यचिकित्सक विभागातील डॉक्टर हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहेत, अशी तक्रार जेजे रुग्णालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी केली आहे.
रुग्णालय प्रशासनाला दिलेला अहवाल प्रलंबित असताना देखील निवासी डॉक्टरांनी आपल्याच नेत्रशल्यचिकित्सक विभागातील अध्यापकांविरोधात संपाचं हत्यार उपसलं होतं, निवासी डॉक्टरांच्या दबावामुळे नेत्र शल्यचिकित्सक विभागातील सर्वच अध्यापकांनी राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, सर्व डॉक्टर प्राध्यापकांनी राजीनामे देताना जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठातांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याकडून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज रुग्णालय प्रशासनाला सोपावण्यात आला आहे.
नेत्रशल्यचिकित्सक विभागातील सर्वच अध्यापकांनी राजीनामे दिल्याने संपूर्ण नेत्र विभागच बंद करण्याची नामुष्की आता जेजे रुग्णालयावर ओढावणार आहे आणि त्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागात दुर्धर आजारांवर देखील उपचार होतात, त्यामुळे संपूर्ण विभाग बंद पडल्यास रुग्णांची तारांबळ उडणार आहे. जेजे रुग्णालय प्रशासन आता काय पाऊल उचलणार, हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा: