Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गाईड्ससाठी स्टार सिस्टम लागू
ताडोबात पर्यटकांना टायगर सफारी घडवणाऱ्या गाईड्ससाठी आता नवीन ग्रेडेशन किंवा स्टार सिस्टम लागू करण्यात आली आहे.
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता गाईड्ससाठी ग्रेडेशन किंवा स्टार सिस्टम लागू करण्यात आली आहे. या मध्ये 3 स्टार, 2 स्टार आणि 1 स्टार मध्ये गाईड्सची विभागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्टार सिस्टमनुसारच ताडोबातील गाईड्सला मिळणारे मानधन देखील निश्चित करण्यात आले आहे.
राज्यातीलच नाही तर देश-विदेशातील पर्यटकांचा अतिशय आवडीचा व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प... याच ताडोबात पर्यटकांना टायगर सफारी घडवणाऱ्या गाईड्ससाठी आता नवीन ग्रेडेशन किंवा स्टार सिस्टम लागू करण्यात आली आहे. यासाठी एप्रिल महिन्यात एक खास परीक्षा घेण्यात आली आणि त्या परीक्षेच्या आधारावर ही स्टार सिस्टम निर्धारित करण्यात आली आहे. या सिस्टमनुसार तीन स्टार मिळालेल्या गाईड्सला 500, दोन स्टार असलेल्या गाईड्सला 450 आणि 1 स्टार असलेल्या गाईड्स साठी 400 रुपये प्रत्येक ट्रिपमागे दर निश्चित करण्यात आला आहे.
एखाद्या गाईडला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबद्दल, तिथल्या प्राण्यांबद्दल आणि जैवविविधतेबद्दल किती माहिती आहे, त्यांना इंग्रजी बोलता येतं का, त्यांचं communication skill कसं आहे आणि सोबतच त्यांचा पर्यटकांसोबत व्यवहार आणि सवयी कशा आहेत यावर मार्क्स देऊन ही वर्गवारी निश्चित झाली. विशेष म्हणजे ग्रेडेशनमुळे गाईड्स च्या मानधनात वाढ होणार असल्यामुळे आपल्या वर्गवारीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्यात एक स्पर्धात्मक भावना देखील तयार झाली आहे.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात या नवीन ग्रेडेशन पध्दती चे चांगले परिणाम दिसून आले आहे त्यामुळे ताडोबा च्या कोर क्षेत्रामध्ये देखील ही पध्दत पावसाळ्यानंतर सुरु होणाऱ्या नवीन हंगामा पासून लागू करण्याचा ताडोबा प्रशासनाचा प्रयत्न आहे.