एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच पोलीस अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न
शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये जेव्हा दंगल सुरु त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी गोवर्धन कोळेकर स्वत: पुढे सरसावले. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत गोवर्धन कोळेकर यांच्या स्वरयंत्रावर दगड लागला.
औरंगाबाद : शहरात दंगल पेटल्यास राजकीय पुढाऱ्यांकडून नेहमीच पोलिसांवर टीका केली जाते. मात्र, औरंगाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने जीवावर उदार होऊन दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्य बजावताना औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले.
शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये जेव्हा दंगल सुरु त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी गोवर्धन कोळेकर स्वत: पुढे सरसावले. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत गोवर्धन कोळेकर यांच्या स्वरयंत्रावर दगड लागला. त्यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्या स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
स्वरयंत्राला दगड लागल्यामुळे कोळेकरांना बोलता येत नव्हतं, डॉक्टरांनी त्यांना डायरी देऊन लिहायला सांगितलं, त्यावेळी त्यांनी कागदावर जे लिहिलं ते पाहून उपस्थित असलेले त्यांचे सहकारी, डॉक्टर आणि कुटुंबीयही स्तब्ध झाले. 'रात्रीची घटना शांत झाली का?' हे पहिले शब्द त्यांनी लिहिले.
आपल्यासोबत जखमी झालेल्या परोपकारी यांची तब्येत कशी आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला. बाजूला मुलगा आणि बायको उभे होते. मात्र स्वतःचं दुःख कागदावर लिहिण्याऐवजी त्यांना शहराची चिंता होती.
कोळेकर शुद्धीत आल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा, पत्नी हे समोर होते. मात्र, त्यांची विचारपूस करण्याआधी कोळेकरांनी आपलं कर्तव्य मोठं मानलं. कोळेकरांनी आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेली ही निष्ठा त्यांच्या कृतीला सलाम करायला प्रवृत्त करते. खरोखरच या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एबीपी माझाचा ही सलाम.
कोण आहेत गोवर्धन कोळेकर?
गोवर्धन कोळेकर सध्या औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी आहेत. जीगरबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद जेव्हा औरंगाबादमध्ये उमटले, तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी कोळेकर स्वतः पुढे गेले होते. त्यावेळी झालेल्या दगडफेकीतही त्यांना एक दगड लागला होता.
औरंगाबाद पेटण्यामागचं नेमकं कारण काय?
औरंगाबाद का धुमसलं यामागे प्रत्येकाकडून वेगवेगळं कारण सांगितलं जात आहे. प्रत्येकाने वेगवेगळा दावा केला आहे.
या दंगलीचं पहिलं कारण हे शहागंज भागातून समोर येतंय. सरदार वल्लभभाईंचा पुतळा आणि या ऐतिहासिक पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण त्यासाठी इथे असलेल्या पानाच्या टपऱ्या हलवण्याची आवश्यकता होती. तसे आदेशही निघाले आणि यावरुनच वादाला तोंड फुटलं आणि त्याला धार्मिक रंग मिळाला, असाही दावा आहे.
शहागंज भागातल्या बाजारपेठेत काही हातगाडीवाले हे व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाड्या लावतात. त्यामुळे दुकानदारांचा त्यांचावर रोष होता. दुकानदारांनी स्थानिक नगरसेवक लच्छू पहिलवान यांच्याकडे दादही मागितली होती. त्यानुसार लच्छू पहिलवान यांनी या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी पालिकेकडे केली. याच वादातून ही जाळपोळ झाल्याचा दावा केला जात आहे.
महापालिकेच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन मोतीकारंजा भागात दोन गटात हाणामारी झाली. त्याच हाणामारीने उग्र रुप धारण केलं आणि मग भडका उडाला, असाही काहींचा दावा आहे.
चौथी थिअरी तर भयंकर आहे. काही दिवसांपूर्वी शहागंज भागात एका व्यक्तीने आंबे खरेदी केले. त्यातले अनेक आंबे खराब निघाले. तेच आंबे बदलून घेण्यासाठी तो विक्रेत्याकडे गेला. विक्रेत्याशी त्याची बाचाबाची झाली आणि त्याच फळांच्या गाड्या हटवण्याची मागणी सुरु झाली आणि त्यातूनच दंगल उसळली, असंही सांगितलं जातंय.
आता त्यात आणखी एका थिअरीची भर घातली ती शिवसेनेने. औरंगाबादमधल्या एका दंगलग्रस्त भागात एका महिलेची छेड काढण्यात आली. त्यावरुन वादाला तोंड फुटलं आणि दोन समुदायाचे लोक एकमेकांवर धावून गेले, असा दावा करण्यात आला.
दंगल झाल्यानंतर अफवा पसरवू नका असं खुद्द सरकार आणि पोलीस सांगतात. पण औरंगाबादमधल्या या जाळपोळीमागे वेगवेगळी कारणं सांगून हवा नेमकी कोण देतंय, हा मोठा प्रश्न आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान
औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement