अजितदादा केंद्रात कुणाला मंत्री करणार? मंत्रिपदही पत्नीला की निष्ठावान नेत्याला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार? पत्नीला मागच्या दारानं संसदेत एन्ट्री मिळवून दिल्यानंतर, अजित पवार मंत्रिपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार? आता हे प्रश्न उपस्थित आहे.
मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) कोट्यात कॅबिनेट मंत्री पद आलं तर ते मलाच मिळणार, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल. सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावाची चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छगन भुजबळांसह 13 इच्छुकांना बाजूला ठेवत अजित पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची माळ पत्नी सुनेत्रा यांच्या गळ्यात घातली. बिनविरोध निवड निश्चित झाल्यावर रॅलीही निघाली. काहींनी दबकत नाराजी व्यक्त केली तर काहींनी मनातच नाराजीचा गळा घोटला. आता हा विषय संपला असं म्हणत नेत्यांसह कार्यकर्तेही दुसऱ्या कामाला लागले. मात्र हा विषय संपला नाही तर खरा आता सुरू झालाय..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार? पत्नीला मागच्या दारानं संसदेत एन्ट्री मिळवून दिल्यानंतर, अजित पवार मंत्रिपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार? आता हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे.मंत्री बनण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा या उत्सुक आहेत. तर दुसरीकडे, मीच मंत्री होणार असा प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण विश्वास आहे. तर केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायलं आवडेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. थोडक्याच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीतून मीच मंत्री होणार
खरं तर 9 जूनलाच झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र उशीरा द्या मात्र कॅबिनेटच द्या या भूमिकेवर अजित पवारांची राष्ट्रवादी ठाम राहिली. त्यामुळे अजितदादांच्या एका शिलेदाराचा राज्याभिषेक होता होता राहिला.
राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
लोकसभेतल्या सुमार कामगिरीनंतर, अजित पवारांसोबतचे अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय. काही जण साथ सोडण्याची भीती असल्यानेच अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा यांना राज्यसभेचं खासदार केल्याचा टोमणा रोहित पवार यांनी लगावला होता. अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या आरोपाला प्रत्युत्तरही दिलंय. मात्र या राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी, राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या प्रश्नाची उत्सुकता वाढवली आहे.
अजित पवार अडकले आगळ्यावेगळ्या चक्रव्यूहात
काकांशी काडीमोड घेत अजितदादांनी शिंदे-फडणवीस यांच्याशी राजकीय पार्टनरशिप सुरू केली आणि ते सत्तेत सहभागी झाले. मात्र अजित पवारांचा हा निर्णय कितपत योग्य होता याचं राजकीय पंडितांनी ऑडिट सुरू केलंय. लोकसभेत जागा वाटपासाठी करावा लागलेला संघर्ष, बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत झालेला पराभव, राष्ट्रवादीशी केलेल्या हातमिळवणीमुळे संघाकडून भाजपला सुनावले जाणारे खडेबोल आणि आता पुरेशी संधी मिळत नसल्याने साथीदारांकडून व्यक्त होणारी खदखद अशा आगळ्यावेगळ्या चक्रव्युहात अजित पवार अडकले आहेत.