(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदुर्गात मध्यरात्री लोडशेडिंग, संतप्त नागरिकांकडून उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण, नऊ जणांविरोधात गुन्हा
तळकोकणात मध्यरात्री अचानक लोडशेडिंग करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केली. या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : राज्यात सध्या लोडशेडिंग सुरु आहे. कोळशाच्या तुडवड्यामुळे भारनियमन करत असल्याचं राज्य सरकारने सांगितलं. त्यातच कोणतीही पूर्वकल्पना न देता रात्री अचानक लोडशेडिंग केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाच्या सबस्टेशनमधील उपकार्यकारी अभियंत्यासह सुरक्षारक्षकाला मारहाण केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर आणि लगतच्या भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री अचानक लोडशेडिंग केल्याने नागरिकांचा संताप झाला. त्यांनी मध्यरात्री दोन वाजता कोलगाव वीज वितरण कार्यालयाच्या सबस्टेशनमध्ये धडक देत उपकार्यकारी अभियंता आनंद गावडे यांच्यासह सुरक्षारक्षक चौरंग सावंत यांना मारहाण केली. हा प्रकार समजताच सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत केले. याप्रकरणी अधिकारी आनंद गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा करून कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकी देणे व कामापासून परावृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात रात्री बारा वाजता अचानक लोडशेडिंग झाल्याचं समजताच कोलगाव उपकेंद्रात नागरिक जमा झाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता भारनियमन करण्यात आल्यामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले. दोन तास लाईट न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री दोन वाजता वीज वितरण कंपनीच्या कोलगाव वीज सबस्टेशनमध्ये धडक दिली. यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. अधिकारी आनंद गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या