मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल महाविकास आघाडीच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या सक्त सूचना; सार्वजनिकरित्या वक्तव्य न करण्याचे आदेश!
महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल मविआच्या उच्चपदस्थ नेत्यांकडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्याय.
Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल मविआतील (Maha Vikas Aghadi) उच्चपदस्थ नेत्यांनी महत्वाच्या सूचना तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेते अथवा पदाधिकारी यापुढे मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल कुठेही सार्वजनिक रित्या वक्तव्य करणार नाही, अशा सूचना तिन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आपआपल्या नेत्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे आणि त्यावरून विनाकारण होणारा संभाव्य विवाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबत मविआ सध्यातरी सतर्क झाल्याचे बघायला मिळत आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य न करण्याचे आदेश!
लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आता जोमाने कामाला लागला असून स्थानिक स्थरापासून ते अगदी उच्चपदस्थ नेत्यांपर्यंत सारेच आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असतांना गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटप पेक्षा मुख्यमंत्री कोण यावर चांगलेच वाक युद्ध रंगल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार असून मुख्यमंत्रिपद हे मेहनत करणाऱ्या नाना पटोले यांना मिळणार असल्याचं वक्तव्य आमदार विकास ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असंही ते काही दिवासांपूर्व म्हणाले होते.
नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाकित व्यक्त केले होते. तर अनेक ठिकाणी त्या आशयाचे बॅनर देखील लागल्याचे बघायला मिळाले होते. मात्र, याचं मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये वाद होण्याची शक्यता बळावली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल मविआतील उच्चपदस्थ नेत्यांनी महत्वाच्या सूचना तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळालं तर त्यात वावगं काय? : नितीन राऊत
निवडणूकीचे तंत्र कार्यकर्त्यांच्या उत्साह आणि जोशावर उभं राहत असतं. कार्यकर्ता जो म्हणतो त्याला काही आधार असतात. विदर्भाच्या मातीचा मुख्यमंत्री बत्तीस वर्ष झालेला नाही. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री तर अजिबात झालेला नाही. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते तशी मागणी करत असले तर त्यात वावगं काय? शेवटी निर्णय हायकमांडचा राहील. मात्र कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे. ती समजून घेतली पाहिजे. असे मोठे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलं होतं. लोकसभा निवडणूक नाना पटोले यांच्या नेतृत्वात लढलो. त्यात आमच्या पक्षाला मोठं यश मिळालं. आता ही पटोले पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून याव्या, अशी भावना आहे. असे असताना एखादा चेहऱ्यावर चर्चा होत असेल तर त्यात वाईट काय? असेही ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या